पाचोरा (प्रतिनिधी) : शहर व परिसरात कोरोना आजाराने अत्यंत वेगाने थैमान घातले असुन लोकप्रतिनिधी, व्यापारी, पोलीस व आरोग्य अधिकारी, डॉक्टर, पत्रकार यांच्यानंतर आता कोरोनाने महसूल विभागाला धडक दिली आहे.
पाचोरा येथील कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांचे सह निवडणुक नायब तहसिलदार संभाजी पाटील व तलाठी मयुर आगरकर यांचा दि. ९ रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव आल्याने महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये जे कोणी गेल्या सात दिवसात संपर्कात आले असतील त्यांनी आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन काही निवडक लोकांना स्वतः राजेंद्र कचरे पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट टाकून केले आहे. पाचोरा येथे गेल्या मार्च महिन्यात पहिला कोरोना बाधित रूग्ण आढळल्यानंतर प्रशासनासह सारेच खडबडून जागे झाले होते. पालिका, महसूल, पोलिस व आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कंबर कसली होती. त्यामुळे बराच काळ रुग्णसंख्या अत्यंत धीम्या गतीने वाढ झाली व सुमारे महिनाभर ती कायम राहिल्याने पाचोरा कोरोना मुक्त झाल्याचा आनंद व्यक्त झाला. परंतु हा आनंद अल्पकाळ टिकला कारण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून शासनाचे नियम न पाळल्याने कोरोना रुग्णांचा व मृत्युचा आलेख झपाट्याने वाढतच आहे.