पाचोरा – भडगावात शासकीय धान्य खरेदी सुरू

0

पाचोरा (प्रतिनिधी) : मागील दोन महिन्यापूर्वी दि महाराष्ट्र स्टेट को – ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, जळगाव यांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी सहकारी संघामार्फत शेतकऱ्यांचे ज्वारी, मका व गहू खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून नोंदणी केली गेली होती. ज्वारी, मका व गहुसाठी पाचोरा – भडगाव तालुका मिळून ३ हजार ५०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मात्र प्रत्यक्षात खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले होते.

खरिपाचा हंगाम येऊन गेला परंतु शेतकरी बांधवाचा रब्बीचा शेतमाल घरात पडून होता. त्यामुळे आर्थिक नियोजन करणे त्यांना जिकिरीचे झाले असतांना काही शेतकरी बांधवांनी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांची भेट घेऊन ही समस्या मांडली. यावर तात्काळ मार्ग निघावा यासाठी अमोल शिंदे यांनी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना दि. १० मे २०२१ रोजी भेट घेऊन पाचोरा – भडगाव सह जिल्ह्यातील शासकीय धान्य खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावी यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली. तसेच खा. उन्मेष पाटील यांनी देखील सहकार व पणन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून यावर तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा सूचना देखील केल्या होत्या.

त्यामुळे अमोल शिंदे यांच्या पाठपुराव्याला  प्रत्यक्षात यश आले आणि धान्य खरेदीचे आदेश प्रशासनाला प्राप्त झाले. परंतु आदेश प्राप्त होऊन देखील प्रत्यक्षात खरेदी करण्यासाठी गोडाऊन उपलब्ध नसल्याने खरेदी होऊ शकत नव्हती. त्यामुळे तेवढ्यावर न थांबता अमोल शिंदे यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी समन्वय साधून तो देखील विषय मार्गी लावला व दि. २२ जून २०२१ रोजी खरेदीला सुरुवात झाली त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.