पाचोरा – जामनेर रेल्वे बंद करण्याचा घाट…!

0

स्वातंत्र्यपूर्व काळात सन 1919 साली ब्रिटीश सरकारने सुरू केलेली पाचोरा – जामनेर अर्थात पी.जे. रेल्वे कोरोनामुळे दोन वर्षापासून बंद आहे. तथापि आता कायमस्वरूपी ही रेल्वे बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे आतील गोटातील वृत्त आहे. 102 वर्षे झालेल्या या पी.जे. रेल्वेचे नॅरोगेजमधून ब्रॉड गेजमध्ये रूपांतर करून ती जगप्रसिध्द अजिंठा लेणीपर्यंत न्यावी, अशी मागणी असतांना उलट ही रेल्वेच बंद करणे म्हणजे पाचोरा – जामनेरला जाणाऱ्या सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांवर मोठा अन्याय होणार आहे.

पाचोरा – जामनेर हे 57 किलोमिटरचे अंतर पी.जे. रेल्वेद्वारे फक्त 2 तास लागतात. या रेल्वेलाईनवर पाचोरा – वरखेडी – शेंदुर्णी – पहूर आणि जामनेर असे स्टेशन्स येतात. आजूबाजूच्या हजारो प्रवाशांना त्याचा लाभ होतोय. कोरोना कालावधीत बंद करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या हळूहळू सुरू होत असतांना पी.जे. रेल्वे सुरू करण्याऐवजी ती बंद केली जात असेल तर हा जळगाव जिल्हावासियांवर विशेषत: पाचोरा – जामनेरला ये-जा करणाऱ्या प्रवाशांवर फार मोठा अन्याय आहे. प्रवाशांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली असून ही रेल्वे पूर्ववत सुरू झाली नाहीतर त्याकरिता आंदोलन करेल असा इशारा पाचोरा – भडगाव मतदारसंघाचे शिवसेना आमदार किशोरअप्पा पाटील यांनी दिला आहे.

सध्या पी.जे. रेल्वेसाठी असलेला कर्मचारी वर्ग भुसावळ रेल्वे विभागात हलविण्यात आल्याचे कळते. सध्या पाचोरा रेल्वे स्टेशन जंक्शनवर यार्डात पी.जे. रेल्वेचे इंजिन डब्यासह उभे आहे. पाचोरा -जामनेर दरम्यान धावणाऱ्या या पी.जे. प्रवासी रेल्वेला उत्पन्न कमी मिळत असेल. परंतु जनतेला सुखसोयी देण्याच्या दृष्टीने नफा – तोट्याचा विचार करणे योग्य होणार नाही. महाराष्ट्रात धावणारी एस.टी. महामंडळाची लालपरी तोट्यात असतांना सुध्दा प्रवाशांच्या सोयीसाठी आणि हितासाठी महाराष्ट्र शासन तोटा सहन करून एसटीचा कारभार चालूच ठेवला. आता एस.टी. कर्मचाऱ्यांचा गेल्या दिड महिन्यापासून संप सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. रेल्वेच्या पॅसेंजर गाड्या सुरू कराव्यात म्हणून सर्वत्र मागणी होत आहे.

तथापि भुसावळ -मुंबई, भुसावळ – नाशिकरोड, भुसावळ – सुरत पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. सध्या लग्नसराई आहे. लग्न सोहळ्याला जाण्यासाठी सर्वसामान्यांचे हाल हेत आहे. नातेवाईकांचे निधन झाले तर ऐनवेळी जाण्यासाठी प्रवासी गाड्यांची सोय नाही. सर्वसामान्यांचा आवाज, त्यांच्या भावना दाल्या जात आहेत. त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या भावना जाणून घेणारे लोकप्रतिनिधी संवेदनशील बनले आहेत. निवडणुकीच्यावेळी त्यांना सर्वसामान्य जनता आठवते.

पाचोरा – जामनेर अर्थात पी.जे. रेल्वे 102 वर्षांनी ब्रिटिशांनी या परिसरात पिकणाऱ्या कापसाची वहातूक करण्यासाठी सुरू केली होती.  व्यापारविषयक हेतूने ब्ब्रिटिशांनी सुरू केलेल्या या रेल्वेला कालांतराने कापसाचे पीक कमी झाले असल्याने कापूस वाहतुकीऐवजी त्याचे रूपांतर प्रवासी वाहतुकीत झाले. कोळशाच्या इंजिनाची जागा डिझेल इंजिननाने घेतली. स्वातंत्र्यानंतर या रेल्वेचे नॅरोगेजऐवजी ब्रॉडगेज करणे अपेक्षित असतांना उलट ही रेल्वेच बंद हेत असेल तर सर्वसामान्य जनतेवर फार मोठा अन्याय आहे. जवळच जगप्रसिध्द अजिंठा लेणी आहे. जगातून पर्यटक या लेण्या पहाण्यासाठी येतात. या पी.जे. रेल्वेचे ब्रॉडग्रेजमध्ये रूपांतर करून अजिंठा लेणीपर्यंत रेल्वे न्यावी तसेच जामनेरहून मलकापूरपर्यंत ब्रॉडगेज रेल्वे लाईन टाकली. तर रेल्वेचे एक सर्कल पूर्ण होऊन प्रवाशांच्या सोयीचे होणार आहे. तशाप्रकारचा सर्व्हेसुध्दा झालेला आहे. त्या दृष्टीने रेल्वेच्या अर्थसंकल्पात तशी तरतूदही केली गेली आहे. परंतु हा निधी प्रत्यक्षात आणण्याचे काम लोकप्रतिनिधींनी करणे अपेक्षित आहे.

तथापि आमचे केंद्रात प्रतिनिधीत्व करणारे खासदार मात्र मूग गिळून गप्प बसलेले आहेत. जळगाव जिल्ह्यातून दोन खासदार केंद्रात प्रतिनिधीत्व करतात. परंतु जनतेच्या हितासाठीच्या निर्णयाबाबत यांचा आवाज का उठत नाही हा खरा प्रश्न आहे. पाचोरा – जामनेर रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करून ती अजिंठा लेणीपर्यंत गेली. रेल्वेला प्रवासी मिळतील अजिंठा लेणीसाठी पर्यटक वाढल्याने पाचोरा जामनेर तालुक्यांची आर्थिक भरभराटसुध्दा होईल. सुबतता निर्माण होईल. दूरदृष्टीने जर लेकप्रतिनिधींनी कामे केली तर आपल्या मतदारसंघाची भरभराट होऊ शकते. परंतु खासदार संवेदनहिन बनले आहेत. जळगाव शहरातून जाणाऱ्या 8 कि.मी. चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. वहातुकीची कोंडी व अपघात टाळण्यासाठी ह्याचे चौपदरीकरण होते आहे.

अपघातात अनेक जणांचा बळी गेल्यानंतर हे चौपदरीकरण होत असतांना आकाशवाणी चौक इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौफुली येथे रोटरी सर्कलऐवजी उड्डाण पूल होणे गरजेचे असल्याचे मान्य असतांना खासदारांनी फक्त घोषणा करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली. जोपर्यंत राजकीय योग्य नेतृत्व मिळणार नाही तोपर्यंत जळगाव जिल्ह्यावर सर्वच बाबतीत अन्याय होईल. रखडलेल्या विकास कामात प्रगती होणार नाही. येरे माझ्या मागल्या चालू राहील पी.जे. रेल्वे बंद करण्याचा घाट हा लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेचाच एक भाग म्हणता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.