कराची :भारताच्या कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानने जैशे महंमद या दहशतवादी संघटनेच्या प्रशासकीय मुख्यालयाचा ताबा घेतला. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला सुबुद्धी आठवायला सुरूवात झाली आहे. दहशतवादी मसूद अजहरच्या मुसक्या आवळण्यास पाकिस्तान सरकारनं सुरुवात केल्याचे वृत्त आहे. पंजाब प्रांतातील बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय पाकिस्तान सरकारने ताब्यात घेतलं आहे.
१४ फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामात झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात भारताच्या ४३ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए मोहम्मदनं घेतली होती. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीमध्ये पुलवामातील हल्ल्याचा निषेध नोंदविला होता. पाकिस्तानचा अत्यंत जवळचा सहकारी असलेल्या चीननेही या ठरावाच्या बाजूने मतदान केले. या आंतरराष्ट्रीय दणक्यानंतर पाकिस्तानने तातडीने हालचाल करून “जैश’च्या मुख्यालयाचा ताबा घेतला.
बहावलपूरमधील मदरसातूल साबिर आणि जामा ए मशिद सुभानल्लामधील मसूदच्या जैश ए मोहम्मदचं मुख्यालय पंजाब सरकारने आपल्या ताब्यात घेतले आहे. ही माहिती पंजाब सरकारच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. या मुख्यालयात ७० शिक्षक आणि ६०० विद्यार्थी आहेत. सध्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे पोलीस मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. मौलाना मसूद अजहरदेखील याच मुख्यालयात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

