मुंबई : कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम कराची शहरात असल्याची कबूली पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती. मात्र, अवघ्या 24 तासात पाकिस्तान सरकारने आपल्या वक्तव्याचा घुमजाव केला आहे. याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला. पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने दाऊद इब्राहिमचे वेगवेगळ्या नावाने बनवलेले अनेक पासपोर्ट, नॅशनल आयडेंटिटी नंबर जाहीर केला. हे जाहीर झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ माजली असणार. त्यामुळेच पाकिस्तानने नकाराची घंटा वाजवली. पाकिस्तान सरकारवर इसीस आणि पाकिस्तानी लष्करचं प्रचंड दडपण आहे. त्याची ही प्रत्यक्ष पावती आहे, उज्ज्वल निकम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तान सरकारवर सडकून टीका केली.
उज्जव निकम म्हणाले, एखाद्या सर्कशीतील जोकरप्रमाणे पाकिस्तान कोलांट्या उड्या मारण्यात पटाईत आहे. पाकिस्तानने याआधीदेखील अनेकवेळा खोटारडापणा केला. ज्यावेळेला पाकिस्तानचे धूर्त माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ भारत भेटीला आले होते. त्यावेळेला त्यांनी कोण दाऊद इब्राहिम? आम्ही ओळखत नाही? आमच्या येथे राहत नाही, अशी नाटकी भाषा केली होती.
ज्यावेळी 26 नोव्हेंबर 2008 रोजी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी ताज हॉटेलमध्ये हल्ला केला होता. त्यावेळीदेखील कसाब आमच्या देशाचा नागरिक नाही, असे पाकिस्तानने जाहीर केले होते. पण पाकिस्तानच्या जिओ टीव्ही या वृत्तवाहिनीने अजमल कसाब हा फरीदकोटचा असल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी पाकिस्तान सरकारला मान्य करावे लागले की, तो त्यांच्या देशाचा नागरिक आहे, असे निकम यांनी सांगितले.
26/11 हल्ल्यानंतर मी आणि भारत सरकारचे चार अधिकारी पाकिस्तानला गेलो होतो. तिथे आम्ही आठ दिवस होतो. त्यांना या हल्ल्याचा मास्टमाइंड हाफिज सईद याच्याविरोधात खटला सुरु करा, असे आम्ही सांगितले. तेव्हा ते म्हणाले पुरावे नाहीत. ते म्हणाले तुम्ही पुरावे द्या. मी म्हटलं कट तुमच्या भूमीत रचला गेला. तुम्ही पुरावे शोधा. त्याला त्यांनी अद्यापही उत्तर दिले नाही, असे ते म्हणाले.