जम्मू: आज पुन्हा एकदा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नौशेरा सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. यात एक भारतीय जवान शहीद झाला. गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं.
केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि ३५ ए रद्द केले. या निर्णयाने पाकिस्तानला जोरदार झटका बसला असून, त्यानंतर मिळेल त्या मार्गाने रोष व्यक्त करणे पाकने सुरू केले आहे. पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधी धुडकावून लावत गोळीबार करीत आहे. शनिवारी सकाळी राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरममध्ये भारतीय चौक्यांना पाककडून लक्ष्य करण्यात आले. पाकने गोळीबारासह उखळी तोफांचा मारा केला. सीमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा जवान शहीद झाला आहे. लान्स नाईक संदीप थापा असे जवानाचे नाव आहे. दरम्यान, पाककडून शनिवारी सकाळी साडेसहा वाजता सुरू झालेला गोळीबार दुपारपर्यंत सुरूच होता.