बुलडाणा, – पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक व सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी विदर्भासह संपूर्ण राज्यात प्रसिध्द असलेली भेंडवळची घटमांडणीची भविष्यवाणी दरवर्षीप्रमाणे आज दि.०८ रोजी पहाटे सहा वाजता जाहीर झाली. शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारणच राहिल तर देशाची सत्ता स्थिर राहिल, असं भाकित भेंडवळच्या भविष्यवाणीतून करण्यात आलं.
साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी आज सकाळी पार पडली. घटमांडणीनंतर रात्रीतून घटामध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण करून सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी यंदाच्या पीक-पाण्याची भविष्यवाणी जाहीर केली आहे. यामध्ये पिक परिस्थिती सर्वसाधारण सांगितले असून पाऊसही सर्वसाधारण आणि लहरी स्वरूपाचा सांगितलेला आहे. पावसाची परिस्थिती पाहता जून महिन्यामध्ये साधारण पाऊस राहील. पहिला महिना साधारण पाऊस, कुठे कमी, कुठे जास्त..सार्वत्रिक पाऊस होणार नाही. दुसरा महिना चांगला पाऊस होईल. तिसरा महिना कमी जास्त पाऊस होईल, मात्र पहिल्या महिन्याच्या तुलनेत नक्कीच जास्त पाऊस पडेल. चौथा महिना मात्र लहरी स्वरुपाच्या पावसाचा राहील. यावर्षी अवकाळी पाऊस पडणे शक्य आहे. त्याचबरोबर कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, हरभरा, इत्यादी पिके घेण्याचे सांगितले. त्यापैकी तूर आणि ज्वारी पिके चांगली येतील असा अंदाज आहे.
घटमांडणी केली गेली तिथे सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि विडा (सुपारी) कायम आहे. पान स्थिर असून त्यावरील नाणंही कायम आहे. सुपारी मात्र किंचित हललेली आहे. त्यामुळे सत्ता स्थिर राहू शकेल असे संकेत आहेत. त्यामुळे राजकीय भविष्यवाणीमध्ये राजाची गादी आणि राजा कायम असून पुन्हा एकदा देशाला स्थिर सरकार येण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. तसेच घटमांडणीमध्ये ठेवलेली करंजी पार हललेली आहे, त्यामुळे देशाला आर्थिक संकटांना सामोरे जावं लागू शकतं, असंही भाकीत मांडण्यात आलं.
शेतीबाबतचे भाकित काय?
अंबाळी – मोघम, रोगराई नाही.
– कापूस – मोघम उत्पादन असून भाव मध्यम राहिल.
– ज्वारी – पीक सर्व साधारण येईल, भावात तेजी मात्र राहणार नाही.
– गहू – पीक मोघम स्वरुपाचे राहिल.
– तांदूळ – मोघम उत्पादन होईल.
– तूर – पीक चांगलं राहिल.
– मूग – मोघम उत्पादन राहिल.
– उडीद – सर्वसाधारण उत्पादन राहिल.
– तीळ – मोघम स्वरुपाचे उत्पादन राहिल.
– भादली – रोगराई शक्य.
– बाजरी – उत्पादन सर्व साधारण असले तरी भावात तेजी राहिल.
– हरभरा – सर्व साधारण स्वरुपाचे उत्पादन राहिल.