पाऊस लांबल्यास जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या होणार गंभीर

0

तापमानामुळे बाष्पीभवनात वाढ, जळगावला राहील डाऊनस्किमचा आधार 

जळगाव-

तीव्र तापमानामुळे बाष्पीभवनात वाढ होत असून पाऊस लांबल्यास जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या भीषण होणार आहे. जिल्ह्यात पाणीपुरवठ्यासाठी 8 दिवसांत 5 टँकरची भर पडली आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण 219 गावांमध्ये 191 टँकर सुरू आहे. तसेच गुरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. जवळपास सर्व ठिकाणी जोरदार पावसावर मदार आहे.

जळगाव शहराला वाघूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराची लोकसंख्या सुमारे पाच लाख असून एवढ्या लोकसंख्येसाठी दररोज 80 एमएलडी पाणीसाठ्याची आवश्यकता असते. सध्या वाघूर धरणात फक्त 16 टक्के जलसाठा शिल्लक असल्याने शहराला 3 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हा जलसाठा जून अखेरपर्यंत पुरणार असल्याचा महापालिका पाणीपुरवठा विभागाचा अंदाज आहे. वाघूर धरणाच्या डाऊन स्कीम व्यतिरिक्त शहराला पाणीपुरवठा होऊ शकेल, अशी पर्यायी ठोस व्यवस्था नाही. वाघूरमधील घटता जलसाठा लक्षात घेता जूनच्या दुसर्‍या आठवड्यापासून शहरात अजून पाणीकपात होऊन पाणीपुरवठा 4 ते 5 दिवसांआड होण्याची शक्यता आहे. डाऊनस्कीमची जलपातळी 215 मीटर इतकी आहे. महापालिकेकडून आतापर्यंत एकाच वर्षी डाऊनस्किमचा वापर करण्यात आला आहे. महापालिकेने फेब्रुवारी महिन्यात डाऊनस्किमची तपासणी केली होती.

भुसावळसाठीचा ब्रिटिशकालीन बंधारा कोरडाठाक

तापी नदीपात्रातील ब्रिटिशकालीन बंधारा आणि हतनूर धरणातून भुसावळ शहराला पाणीपुरवठा होतो. हतनूर धरणात दरवर्षी सुमारे 22 टीएमएलसी पाणीसाठा भुसावळसाठी आरक्षित असतो. यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने ब्रिटिशकालीन बंधारा कोरडाठाक आहे. हतनूर धरणातील जिवंत साठा संपला असून मृतसाठा 25 टक्के शिल्लक असल्याचा अंदाज आहे. हतनूरमध्ये 55 टक्के गाळ असल्याने बिकट स्थिती उद्भवली आहे. सद्यस्थितीत भुसावळ शहराला 12 ते 15 दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. भुसावळची लोकसंख्या सुमारे अडीच ते पावणे तीन लाखांवर आहे. विंधन विहिरी, टँकर व इतर उपाययोजना सुरू आहेत.

अमळनेरसाठी अजून महिनाभर जलसाठा

अमळनेर शहराला जळोद येथील तापी नदीपात्रातील डोहमधून पाणीपुरवठा केला जातो. शहरात 5 दिवसांआड पाणीपुरवठा होात आहे. तापी नदीपात्रातील डोहामध्ये असलेला जलसाठा अजून महिनाभर पुरू शकतो. पाऊस लांबणीवर पडला तर अमळनेर शहरासाठी पर्यायी व्यवस्था नगरपालिकेने केली आहे. शहरात 25 ते 30 कूपनलिका तसेच नगरपालिकेच्या मालकीच्या 8 ते 10 सार्वजनिक विहिरी आहेत. त्याद्वारे पाणीपुरवठा होऊ शकतो. हिरा उद्योग समूहाच्या सौजन्याने तापी नदीपात्रातील बोअरवेलचा आधार आहे.

यावल आवर्तनावर अवलंबून 

यावल शहराला हतनूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. हतनूर धरणातून कालव्याद्वारे पाणी यावल शहरातील साठवण तलावात आणण्यात येते. येथून पाइपलाईनने शहरात पाणीपुरवठा होतो. यावल शहरासाठी हतनूर धरणातून कालव्याद्वारे आवर्तन सोडले जाते. 15 एप्रिल रोजी आवर्तन सोडण्यात आले होते. ते साधारणपणे सव्वा दोन महिने पुरेल, असा अंदाज आहे. शहराला दररोज सुमारे 50 ते 60 लाख लीटर पाणी लागते. पाऊस लांबणीवर पडला तर नगरपालिकेच्या 3 सार्वजनिक विहिरी आहेत, त्याद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नगरपालिकेचे नियोजन आहे. शहरात तीन-चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.

चोपडा गूळ मध्यम प्रकल्प व विहिरींवर अवलंबून

चोपडा शहराला सद्यस्थितीत 8 ते 10 दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. गूळ मध्यम प्रकल्पासह तालुक्यातील कठोरा येथील तापी नदीपात्रातील नगरपालिकेच्या विहिरींवरून शहराला पाणीपुरवठा होत आहे. गूळ प्रकल्पात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने तो जूनच्या पहिल्याच आठवड्यात संपुष्टात येईल. त्यानंतर परिस्थिती अजून बिकट होईल. शहरासाठी गूळ मध्यम प्रकल्प मालापूर ते चोपडा 14 कि.मी.अंतरावून पाइपलाइन आली आहे.

चाळीसगाव गिरणावर, तर भडगावात विहिरींची आधार 

चाळीसगाव शहराला नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गिरणा धरणात 9 टक्के जलसाठा शिल्लक असून चाळीसगावात 4 दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. गिरणा धरणात शिल्लक असलेला पाणीसाठा लक्षात घेता चाळीसगाव शहराला जुलै महिन्यापर्यंत पाणीपुरवठा होऊ शकतो. गिरणा धरणाचे एक आवर्तन सुटण्याची शक्यता आहे. भडगाव नगरपालिकेने गिरणा नदीपात्रात 3 सार्वजनिक विहिरी खोदल्या आहेत. पाच पाणीपुरवठा योजना आहेत. या विहिरींद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जातो. सुमारे 40 हजार लोकसंख्या असलेल्या भडगाव शहराला दररोज 15 ते 16 लाख लीटर पाण्याची गरज भासते. पाऊस लांबला तरी नगरपालिकेच्या तिन्ही विहिरींचे पाणी शहराला पुरेसे आहे. सध्या चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे.

पाचोर्‍यासाठी हवे पाचवे आवर्तन

पाचोरा शहराला गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. नगरपालिकेचे योग्य नियोजन नसल्याने शहराला सद्यस्थितीत 5 दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पाऊस लांबणीवर पडला तर पाचोरा शहराची स्थिती अजून बिकट होऊ शकते. गिरणा धरणातून पाचवे आवर्तन सोडले तर शहराला काही अंशी दिलासा मिळू शकतो. बहुळा प्रकल्पातून 2016 मध्ये तातडीची साडेसहा कोटींची पाणीपुरवठा योजनेचे काम केले होते.

धरणगावासाठी गूळ प्रकल्पावरुन तात्पुरती सोय

धरणगाव शहरात पाणीपुरठ्याचा प्रश्न बिकट आहे. सद्यस्थितीत शहराला 15 दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. धरणगाव शहराला तापी नदीवरून तापी पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. 40 हजारांहून अधिक लोकसंख्या असल्याने शहराला सद्यस्थितीत होणारा पाणीपुरवठा अपूर्ण पडत आहे. पाऊस लांबला तर येथील परिस्थिती अजून बिकट होईल. गूळ प्रकल्पावरुन पाणीपुरवठ्याची तात्पुरती सोय केली आहे.

एरंडोलला लमांजन बंधार्‍यावर मदार 

एरंडोल एरंडोल शहराला सद्यस्थितीत 6 दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. अंजनी प्रकल्पासह काही कूपनलिका आणि सार्वजनिक विहिरींवर शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त आहे. लमांजन बंधार्‍यावरील पाइपलाइनवर मदार आहे. आताच पाणीसंकट गंभीर आहे. त्यातच पाऊस लांबणीवर पडला तर मात्र, अजून बिकट परिस्थिती निर्माण होईल. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था नगरपालिकेने केलेली नाही.

जामनेरला जळगावच्या डाऊन स्किमचा धोका 

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर शहराला वाघूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत शहराला 5 ते 6 दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. वाघूरमध्ये केवळ 16 टक्के जलसाठा शिल्लक असून जामनेरला जून अखेरपर्यंत समस्या उद्भवणार नाही. पाऊस लांबणीवर पडला तर मात्र, जळगाव महापालिका जळगाव शहरासाठी डाऊन स्कीमचा वापर करेल. तेव्हा जामनेरच्या समस्या वाढू शकतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.

बोदवडला जीर्ण पाइपलाइन 

मुक्ताईनगर-बोदवड तालुक्यातील पाणीपुरवठ्याची स्थिती बिकट आहे. मुक्ताईनगरपेक्षा बोदवड शहराची स्थिती अत्यंत वाईट आहे. मुक्ताईनगर शहराला 2 दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तर बोदवड शहरात तब्बल 22 ते 25 दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. मुक्ताईनगरला पूर्णा नदीतील जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे काही जॅकवेल उघडे पडले आहेत. त्यामुळे मुक्ताईनगर नगरपंचायतीने अजून खाली काही जॅकवेल केले आहेत. त्यामुळे शहरात पाणी समस्या निर्माण झालेली नाही. पाऊस लांबला तर थोडी परिस्थिती गंभीर होईल. बोदवड शहराला पूर्णा नदीवरील ओडीएच्या 81 गाव पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या योजनेत बोदवड शहरासह तालुक्यातील 60 गावांचा समावेश आहे. परंतु, पाइपलाइन जीर्ण झाल्याने गळती अधिक होते. तर पाइपलाइन फुटण्याचे प्रमाण अधिक आहे.

पारोळा शहरात सद्यस्थितीत 15 दिवसांआड पाणीपुरवठा

पारोळा शहरात सद्यस्थितीत 12 ते 15 दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील तामसवाडी धरणातून पारोळा शहराला पाणीपुरवठा होतो. तामसवाडी धरणात शून्य टक्के जिवंत पाणीसाठा आहे. तालुक्यातील बहुसंख्य गावे टँकरवर अवलंबून आहेत. शहरात काही ठिकाणी कूपनलिका आहेत. त्याद्वारे त्या त्या प्रभागातील पाणीपुरवठा होत आहे. जुलै महिन्याअखेर जलसाठा पुरेल, असा अंदाज पालिका प्रशासनाचा आहे.

रावेरात फारसा ताण नाही

रावेर शहराला सद्यस्थितीत एका दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शहराला तापी नदीतील जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा केला जात असून अजून किमान 15 ते 20 दिवस समस्या निर्माण होणार नाही. पाऊस लांबणीवर पडला तर पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी नगरपालिकेने आधीच नियोजन करून ठेवले आहे. नगरपालिकेच्या मालकीच्या शहरात 4 कूपनलिका आहेत. त्यांना चांगले पाणी असल्याने शहराला पाणीटंचाई भेडसावणार नाही. शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी 4 झोन आहेत. प्रत्येक दिवशी 2 झोनला पाणीपुरवठा केला जातो. रावेर शहराची लोकसंख्या विचारात घेतली असता शहराला दररोज सुमारे 44 लाख लीटर पाणी आवश्यक असते. पाऊस लांबला तर एक ऐवजी दोन दिवसांआड पाणीपुरवठा होऊ शकतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.