पहूर, ता. जामनेर (प्रतिनिधी) कोरोना विषाणू संक्रमणामुळे शाळेला असलेल्या सुट्टयांमध्ये पहूर येथील मावशीकडे पाहुणा म्हणून आलेल्या ७ वीच्या विद्यार्थ्याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हरी -विठ्ठल नगर, जळगाव येथील वैभव सुकलाल बारी (वय १३ ) हा सातवीत शिकणारा विद्यार्थी शाळेला सुट्या असल्यामुळे पहूर पेठ येथे राहणाऱ्या उषाबाई रमेश बारी या मावशीकडे पाहुणा म्हणून आलेला होता . रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास माऊशीच्या घरीच त्याला विषारी सापाने दंश केला. त्यास तत्काळ ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारार्थ जामनेर येथील ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असतानाच आज मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. मयत वैभवच्या पश्च्यात आई -वडील बहीण असा परिवार आहे . हरी विठ्ठल नगर जळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.