पहिल्याच दमदार पावसाने जळगाव जलमय

0

जळगाव : बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता विजांच्या कडकडाटासह जाेरदार पावसाने जळगाव शहराला अक्षरक्ष: झोडपले. संध्याकाळी आपले काम आटोपून घराकडे निघालेल्या चाकरमान्यांना या पावसाचा सामना करावा लागला. तर पाऊस थांबण्याची आडोशाला थांबून नागरिकांना वाट पहावी लागली. सुमारे ४५ मिनिटे झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने रस्ते बंद झाले. बजरंग व समांतर बाेगदा अर्धा पाण्याने भरल्याने नागरिकांची पिंप्राळा रेल्वेगेट मार्गाने गर्दी झाल्याने वाहतूक ठप्प झाली हाेती. तसेच वीजतारा तुटण्यासह तारांवर झाड पडल्यामुळे जिल्हापेठ, स्वातंत्र चौक, अयोध्यानगर, भोईटेनगर भागात सुमारे दीड तासापेक्षा अधिक वेळ वीजपुरवठा बंद हाेता. ताे सुरळीत करण्यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही दमछाक झाली.

शहरात बुधवारी दिवसभर घामांच्या धारांनी हैराण झालेल्या जळगावकरांना सायंकाळी ५.३० वाजता अचानक अालेल्या जाेरदार पावसामुळे दिलासा मिळाला. जाेरदार पावसामुळे शहरासह उपनगर व बाजारपेठेतील अनेक भाग पाण्याने वेढल्याने लाेकांच्या त्रासात भर पडली. पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्याचे नाल्यात रूपांतर हाेऊन रहिवाशांचा इतर भागाशी संपर्क तुटला हाेता. नेहरू चौक, नवीपेठ, सुभाष चौक, फुले मार्केट परिसरातील व्यावसायिकांची धावपळ उडाली. कोर्ट चौक, बेंडाळे चौक, छत्रपती शिवाजी स्टेडियम, तांबापुरा, खंडेरावनगर, पिंप्राळा, सुभाष चौक, नवीपेठ, जिल्हा परिषद परिसर, बजरंग बोगदा व त्यालगतचा समांतर बोगदा आदी भागात पाणी साचून नागरिक रस्त्यातच अडकून पडले होते. शाळा, विविध सरकारी व खासगी कार्यालये सुटण्याच्या वेळेला आलेल्या पावसामुळे नोकरदार तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांचे माेठ्या प्रमाणात हाल झाले. खंडेरावनगरातील काही घरांमध्ये रस्त्यावरील पाणी गेल्याने या परिसरातील नागरिकांचे हाल झाले. तर शिवरामनगरात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या बंगल्याच्या शेजारील गुलमाेहाेराचा वृक्ष भाजपचे अशाेक रंगलानी यांच्या बंगल्यावर काेसळले. त्यात सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. क्रेनने हे झाड हटवण्यात अाले.

Leave A Reply

Your email address will not be published.