मुंबई – मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईतील लाईफलाईन बंद करण्यात आली होती. मात्र लॉकडाउन सुरू झाल्यापासून बंद असलेली लोकलसेवा अनलॉक प्रक्रियेनंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. परंतु अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू असली तरी लोकलच्या फेऱ्या मात्र मर्यादीत होत्या. दरम्यान, या ट्रेनमध्ये होणारी गर्दी पाहत पश्चिम रेल्वेनं मोठा निर्णय घेतला असून, या निर्णयानुसार २१ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेवर लोकलच्या १५० अधिक फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. तेव्हापासून या लोकल फेऱ्यांना प्रवाशांची गर्दी सातत्याने वाढत आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ३५० लोकल फेऱ्या चालवण्यात येत आहेत. मात्र गर्दीचे वाढते प्रमाण विचारात घेऊन पश्चिम रेल्वेने अजून १५० फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता २१ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेवर उपनगरीय लोकल सेवेच्या एकूण ५०० फेऱ्या चालवण्यात येतील. या निर्णयामुळे उपनगरांमधून मुंबईत येणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.