पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीने नववर्षाची सुरवात

0

धरणगाव (प्रतिनिधी) : “स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान” अंतर्गत, धरणगाव नगरपरिषद व विकल्प ऑर्गनायझेशन, धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “पर्यावरण जनजागृती सायकल रॅली” उत्साहात संपन्न झाली. गावातील मुख्य चौक व रस्त्यांवरून पर्यावरण जनजागृती करत नगरपरिषद धरणगाव येथे छोटेखानी कार्यक्रमाने रॅलीचा समारोप झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धरणगाव नगरपरिषद व विकल्प ऑर्गनायझेशन धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीस शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ, विकल्प ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रा. रविंद्र मराठे, कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील, सचिव नरेंद्र पाटील व रा. चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ झाला. रॅलीत लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, मुख्याधिकारी जनार्दन पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ, गटनेते कैलास माळी सर, नगरसेवक विलास महाजन , सचिन सूर्यवंशी यांच्यासह गावातील व परिसरातील नागरिक, शिक्षकवृंद, डॉक्टर्स, वकील, शाळा – महाविद्यालयातील विद्यार्थी बंधू भगिनींनी सहभाग नोंदवला. रॅलीचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक – सोनवद रोड – कोट बाजार – भाटीया प्रोव्हिजन – विजय ज्वेलर्स – मशिद अली – रामलीला चौक – जांजीबुवा चौक – बालाजी मंदिर – हनुमान नगर – बजरंग चौक – राजमाता जिजाऊ चौक – डेलची – धरणी चौक – क्रांतिसूर्य महात्मा फुले स्मारक – कोट बाजार – लाल बहादूर शास्त्री स्मारक – परिहार चौक मार्गे नगरपरिषद धरणगाव येथे सायकल रॅली पोहचली दरम्यान रॅली च्या मार्गातील सर्व महापुरुषांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

नगरपरिषदेत छोटेखानी कार्यक्रमाने पर्यावरण जनजागृती बाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन विचार मंचावरील मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी देऊन वृक्षसंवर्धनाचा सकारात्मक संदेश देत करण्यात आला. विकल्प ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रा. रविंद्र मराठे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा मांडला. मागील 13 वर्षांपासून विकल्प च्या माध्यमातून विविधांगी कार्यक्रम आयोजित करून सामाजिक कार्य केल्याचं स्पष्ट केलं. आजच्या पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे स्वरूप व उद्देश सांगतांना, नवीन वर्षाचा नवीन संकल्प – ‘पर्यावरण वाचवा सृष्टी वाचवा’ असे प्रास्ताविकाच्या रूपाने मांडले. विकल्पचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. सामाजिक कार्य करत असतांना यापुढे देखील सातत्याने पर्यावरण, आरोग्य, स्वछता, या क्षेत्रात सर्वंकष कार्यक्रमांचे आयोजन करून ‘धरणगाव फर्स्ट’ बनविण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे स्पष्ट केले. अतिथी मान्यवरांच्या सत्कार प्रसंगी प्रत्येकाला विविध वृक्षांचे १ रोप भेट स्वरूप देण्यात आले.

मनोगताच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असा सूर मान्यवरांच्या बोलण्यातून जाणवला. याप्रसंगी गटनेते कैलास माळी अभिनव उपक्रम आयोजित केल्याबद्दल स्तुती केली व कार्यक्रमाला सदिच्छा व्यक्त केल्या. मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी “पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश” यांचे आपल्या जीवनातील महत्व प्रतिपादन केले. स्वच्छ व सुंदर धरणगाव बनविण्यासाठी तसेच माझी वसुंधरा अभियानात शहराला राज्यात अव्वल स्थान प्राप्त होण्यासाठी नागरिकांनी शासन – प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी पूर्वानुभव व आताचे धावपळीचे युग या माध्यमातून व्यायामाचे आणि पर्यावरणाचे महत्व स्पष्ट केले. लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी त्यांच्या वर्षभराच्या कारकिर्दीत केलेल्या कामांचा आढावा सांगितला. भविष्यात ‘धरणगाव फर्स्ट’ बनविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले. कार्यकर्माचे अध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ यांनी पर्यावरण, आरोग्य, आघाडी शासनाचे विकासाचे धोरण, शहराचा सर्वांगीण विकास याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रातिनिधिक स्वरुपात काही सायकल स्वारांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रॅलीत इंदिरा गांधी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,  सा. दा. कुडे विद्यालय, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पी. आर. हायस्कूल, महात्मा फुले हायस्कूल, अँग्लो उर्दू हायस्कूल, गुड शेपर्ड स्कुल या सर्व शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. पर्यावरण जनजागृती रॅलीत सहभागी प्रत्येकाला टी – शर्ट, कॅप व सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, मुख्याधिकारी जनार्दन पवार, उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन, आरोग्य सभापती उज्वला नाना साळुंखे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, गटनेते कैलास माळी, नगरसेवक विलास महाजन, भागवत चौधरी, वासुभाऊ चौधरी, गुलाब मराठे, विकल्प ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रा. रविंद्र मराठे, सचिव नरेंद्र पाटील, कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील, कोषाध्यक्ष योगेश सोनार, सदस्यांमध्ये मंगला पाटील, ज्योती पाटील, उपाध्यक्ष अमोल महाजन तसेच निवृत्त मुख्याध्यापक एस. डब्ल्यू पाटील, पत्रकार आर. डी. महाजन, जितेंद्र महाजन, विनोद रोकडे, शिक्षक वर्गामध्ये प्रा. ए. आर. पाटील , प्रा. व्ही. आर. पाटील, प्रा. राखी पाटील, एस. एल. सूर्यवंशी, पी. डी. पाटील, हेमंत डी. माळी, व्ही. टी. माळी, एम. डी. परदेशी. एन. वाय. शिंदे, परशुराम पाटील, एस. एन. चौधरी, एस. एम. देशमुख, जी. पी. चौधरी, महंमद इस्माईल महंमद सादीक, सय्यद अब्दुल बारी वसिफ अली हे सर्व शिक्षकवृंद, गावातील व परिसरातील नागरिक, विविध शाळांचे विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धरणगाव नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक संजय मिसर, करनिरिक्षक प्रणव पाटील, शहर समन्वयक निलेश वाणी तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग, आरोग्य विभागाचे मुकादम व सफाई कर्मचारी तसेच विकल्प ऑर्गनायझेशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या अतिशय नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विकल्पचे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.