पर्यायी मार्गासाठी शिवाजीनगर वासियांचा रेल रोकोचा इशारा

0

जळगाव –
शिवाजी नगरवासियांना पर्यायी मार्ग उपलब्ध करुन न देता रेल्वे प्रशासनाने पुल तोडण्याची कारवाई हाती घेतली आहे. पर्यायी मार्गाअभावी शिवाजी नगर वासियांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सुरत रेल्वे गेटवर अडकून पडल्याने तीन अत्यवस्थ रुग्णांचा मृत्यू झाला. प्रशासनाने आपल्या मागण्या मान्य न केल्यास रेलरोकोचा नारा देण्यात येईल, असा सूर क्रांती चौकात शिवाजी नगर बचाव संघर्ष समिती आयोजित सभेत उमटला. यावेळी व्यासपीठावर संघर्ष समितीचे अध्यक्ष दिपककुमार गुप्ता, जहाँगीर खान, इम्रान शेख,विजय बांदल आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक जहाँगीर खान यांनी व्यक्त केले. पुल पाडण्याच्या अगोदर पर्यायी मार्ग का दिला नाही याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती त्यांनी दिली. टी आकाराच्या पुलाला आपला विरोध आहे. वाय आकाराच्या पुलासाठीही याचिका दाखल केलेली आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मणसभेनजीक बोगदा तयार करुन द्यावा, . तहसिलदार कार्यालयाजवळ तात्पुरते रेल्वे गेट उभारावे अशा आपल्या मागण्या असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
30 कोटी रुपये खिशातून जाणार
रेल्वे प्रशासनाकडून पर्यायी मार्ग न देता पुल तोडण्यात येवून पर्यायी मार्ग हा 12 किलोमीटरचा आहे. त्यामुळे यासाठी लागणारे पेट्रोलसाठी लागणारा खर्च नागरिकांच्या खिशातून जाणारं आहे. सदर बांधकामासाठी 27 कोटीचे नियोजन आहे. मात्र 12 किलोमीटरचा रस्त्यासाठी लागणारे पेट्रोल हे देशाचे खर्च होणार असून अंदाजे 30 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे, असे मत नानासाहेब राजपूत यांनी मांडले.
पर्यायी रस्त्यासाठी याचिका- दिपककुमार गुप्ता
शिवाजी नगर पुल उभारणीबाबत बोलताना गुप्ता यांनी वाय आकाराच्या पुलाची मागणी केली आहे. टी आकाराच्या पुलामुळे शहरवासिय तसेच ग्रामस्थांना सहाशे मीटर्सचा मोठा फेरा पडणार आहे. तर वाय आकाराच्या पुलामुळे केवळ तिनशे मिटरचे अंतर कापावे लागणार असल्याने वाय आकाराचा पुलाची मागणी असल्याचे दिपककुमार गुप्त यांनी बोलताना सांगितले. तसेच पर्यायी रस्त्यांसाठी रिट याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
मोबाईलचे लाईट लावून समर्थन
सभेच्या सुरुवातीलाच लाईट गेले त्यामुळे व्यासपीठ व परिसरातील अंधार पसरला. यावेळी आयोजकांकडून सदरची ही विरोधकांची चाल असल्याचे सांगितले गेले.
आपली सभा यशस्वी होऊ नये असे समाजकंटकांना वाटते आहे. त्यामुळे उपस्थित नागरिकांना आपल्या जवळील मोबाईलचा लाईट लावण्याची विनंती करण्यात येवून उपस्थितांचे समर्थन आयोजकांकडून मागण्यात आले. यावेळी नारायण अग्रवाल, धनंजय चौधरी, फारुख भाई, जमील शेख, उमाकांत वाणी, राज अमोल उपाध्याय आदींनी आपले मत मांडले.

Leave A Reply

Your email address will not be published.