परेशान सत्याची वाटचाल!

1

परेशान सत्याची वाटचाल!
खान्देशात एकनाथराव खडसेंना मानणारा मोठा वर्ग आहे. प्रशासनावर त्यांची असलेली पकड, त्यांनी उभा केलेला विकासाचा दीपस्तंभ पुन्हा उजाळून काढण्यासाठी त्यांना आता भाजपकडे गोंजारण्याशिवाय पर्याय नाही आणि हाच पर्याय ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुढे करीत आहेत. खडसेंवरील सर्व आरोप निराधार असल्याचे विविध तपासातून पुढे येत असून त्याचा पक्ष फायदा घेण्याचा प्रयत्नात आहे. त्यात पक्षाला किती यश येते हे काळच ठरविणार आहे.

सत्य परेशान होता है पराजित नही! अशी हिंदीत एक कांव्यपक्ती आहे. सत्याला नेहमीच परेशानीचा सामना करावा लागतो ही परेशानी असली तरी ती पराजित होते हा आजवरचा इतिहास आहे आणि तो इतिहास लिहिण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. सत्याच्या परेशानीचे पराजयात रुपांतर करताना बर्‍याच खस्ता खाव्या लागतात… वेळप्रसंगी जवळचे लोक दूरावतात… मात्र त्यावर मात करुन सत्याचा विजय होतो आणि दूर केलेले लोकही सहज जवळ येतात हा आजवरचा अनुभव आगामी काळात भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना देखील येणारच आहे. विविध आरोपांचे धनी झालेले श्री. खडसे यांना मंत्रिमंडळातून मिळालेला डच्चू त्यांच्यासाठी जसा क्लेशदायक होता त्यापेक्षा अधिकप्रमाणावर तो कार्यकर्त्यांसाठी आणि जिल्हावासियांसाठी होतो. नाथाभाऊंची या आरोपातून सहसलामत सुटका होत असली तरी त्यांच्या मंत्रीमंडळ विस्तरातील सहभाग कसा असेल हे आगामी काळच ठरविणार आहे. खान्देशात काँग्रेसचा असलेला बालेकिल्ला उद्ध्वस्त करुन भाजपाचे कमळ फुलविण्यात नाथाभाऊंचे केवळ योजदानच नाही तर मोठे कष्ट देखील आहेत. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे आणि तो टीकला तरच पक्ष टिकेल या धोरणाने नाथाभाऊंनी भाजपाची उभारणी केली. भाजपाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत अच्छेदिन आले मात्र नाथाभाऊंना मंंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले. तथित आरोपांमधून भाऊंची होणारी सहीसलामत सुटका कार्यकर्त्यांसाठी एक उभारी देणारी आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना भोसरी भूखंड खरेदी प्रकरणी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणाचा अहवाल एसीबीने न्यायालयात सादर केला असून हा अहवाल न्यायालयाने मान्य केला तर खडसे यांचा मंत्रिमंडळात परतण्याचा मार्ग मोकळा होईल असे असले तरी जळगाव जिल्ह्याची झालेली तुटफुट पूर्ववत आणण्यासाठी भाऊंना मोठे कष्ट उपसावे लागणार आहे. सहा महिन्यात घर देखील बांधून होत नाही तेथे जिल्ह्याची बाांधणी कशी होईल हा प्रश्नच आहे. येत्या सहा महिन्यात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होणार असून नाथाभाऊंचा मंत्रिमंडळातील समावेश आीण आचारसंहिता या दुहेरी समीकरणाचे यमक भाऊंना समर्पक करावे लागणार आहे हे मात्र निश्चित! बदलती राजकीय परिस्थिती खडसे यांच्या पथ्यावर पडली असून उत्तर महाराष्ट्रात पुन्हा भाजपला ताकद देण्यासाठी खडसे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात येईल, असे दिसत असले तरी गत काळात खडसे यांच्याकडे असलेले डझनभर मंत्रीपदे पुन्हा मिळणे शक्य नाही. खडसे यांच्यासाठी पक्ष कोणती भुमिका घेतो आणि त्याला खडसे कशी साद घालतात हे महत्वपूर्ण आहे.
अंजली दमानिया यांनी खडसे यांच्यावर आरोप केला असला तरी यामागे पक्षांतर्गत विरोधक सक्रीय आहेत, असे खडसे यांच्या समर्थकांना वाटते. राज्यात सत्ता आल्यानंतर खडसे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तरी महसूल या महत्त्वाच्या खात्यासह बारा अन्य खाती त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते जोरात आवाज चढवायचे, मंत्रिमंडळाची बैठक ताब्यात घ्यायचे. पण हाच त्यांचा आक्रमकपणा त्यांना मंत्रिमंडळाबाहेर जाण्यासाठी कारणीभूत ठरला हे मात्र मान्य करावे लागणार आहे.
प्रदेश भाजपमधील पूर्वीच्या प्रस्थापित नेत्यांचे महत्त्व कमी करण्याचे धोरण भाजपच्या केंद्रिय नेतृत्वाचे आहे. भोसरी प्रकरण उजेडात येताच या प्रकरणाला हवा देण्याचे काम खडसे यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी केले. त्यात खडसेंचा पत्ता कट झाला. विशेष म्हणजे खडसे यांच्यावरील आरोप हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने केले नव्हते, तरी त्यांची सहज विकेट गेली. पक्षात नेतृत्वाची नवी फळी तयार करण्याचे धोरण आणून राबविले गेले. त्यामुळे गेली दोन वर्षे पक्षाच्या नेत्यांवरही खडसे कमालीचे नाराज होते. विधानसभेत तसेच बाहेरही ते सरकारला अडचणीत आणण्याचे काम करत होते. परंतु पक्षाच्या केंद्रिय नेतृत्वाकडून खडसेंच्या राजकीय पुनर्वसनाबाबत हिरवा कंदील दाखविला जात नव्हता. मात्र आता लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी होत आहेत. राज्याच्या ग्रामीण भागात विशेषत: उत्तर महाराष्ट्रात खडसे यांचे वर्चस्व आहे. गेली 35 वर्षे त्यांनी उत्तर महाराष्ट्रात भाजपचे वर्चस्व ठेवले आहे. त्यामुळे खडसेंना निवडणुकीत सोबत घेणे भाजपसाठी महत्त्वाचे होते. त्यामुळे खडसे यांना मिळालेली क्लीन चीट ही त्यांच्यासाठी तसेच उत्तर महाराष्ट्रात भाजपसाठीही दिलासा देणारी आहे. विदर्भ व उत्तर महाराष्ट्र येथे भाजपचे नेहमीच वर्चस्व राहिलेले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात खडसे यांच्याबरोबर जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे नेतृत्वही भाजप पुढे आणत आहे. खडसे हे लेवा पाटील समाजाचे आहेत. हा समाज उत्तर महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहे. हा समाज भाजपकडे आहे. राज्यातील शहरी भागात भाजपाचे वर्चस्व असले तरी ग्रामीण भागात त्यांना फटका बसेल की काय, अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे खडसे यांचे राजकीय पुनर्वसन त्यांच्याबरोबर भाजपसाठीही महत्त्वाचे आहे. मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागल्यानंतर खडसे यांच्यासारखा बडा नेता गळाला लावण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. खडसे यांच्याशी भेटीगाठीही या नेत्यांनी केल्या होत्या. खडसे यांच्या रागावर फुंकर घालण्याचे काम केले जात होते. मात्र खडसे यांनी पक्षासोबत राहण्याचे ठरविले असल्याने विरोधकांची निराशा झाली. काँग्रेस सत्तेवर असताना त्यांच्या मंत्र्यांवर झालेले आरोप आणि पक्षाने त्यांना न दिलेली साथ यामुळेच 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचा हात जनतेने धरला नाही. हाच काँग्रेसला कित्ता भाजपाने गिरविला तर भाजपाला देखील फटका बसू शकतो हा विचार करुनच भाजपने खडसेंच्या पाठीमागे उभे राहणे पसंत केले आहे. भाजपने खडसेंचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेऊन राजकीय शहाणपणा दाखविला असला तरी त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश आणि पुढील कारर्कीद उत्तर महाराष्ट्रात भाजपचे वर्चस्व राखण्यासाठी ते महत्त्वाची ठरणार आहे. खडसे मंत्रिमंडळातून बाहेर राहिल्यामुळे छत्तर महाराष्ट्राचे विशेषत: जळगाव जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. सहा महिन्यात घर देखील बांधले जात नाही तेथे जिल्ह्यातील पुर्नबांधणी करण्यासाठी नाथास्त्र भाजप बाहेर काढत असले तरी वराती मागून घोडे असे तर होणार नाही ना? या बुचकाळ्यात देखील कार्यकर्ते आहे. खान्देशात खडसेंना मानणारा मोठा वर्ग आहे. प्रशासनावर त्यांची असलेली पकड, त्यांनी उभा केलेला विकासाचा दीपस्तंभ पुन्हा उजाळून काढण्यासाठी त्यांना आता भाजपकडे गोंजारण्याशिवाय पर्याय नाही आणि हाच पर्याय ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुढे करीत आहेत. खडसेंवरील सर्व आरोप निराधार असल्याचे विविध तपासातून पुढे येत असून त्याचा पक्ष फायदा घेण्याचा प्रयत्नात आहे. त्यात पक्षाला किती यश येते हे काळच ठरविणार आहे.

– मन की बात
दीपक कुळकर्णी

 

1 Comment
  1. शरद कुलकर्णी says

    वा..दिपक बाबु वा….बढिया लिखाण

Leave A Reply

Your email address will not be published.