खामगाव (प्रतिनिधी) : शहरापासून जवळच असलेल्या घाटपूरी शिवारातील मुलींच्या वस्तीगृहात प्रशासनाने क्वॉरंटाईन केलेल्या परप्रांतीय मजुरांना एका पोलिस कर्मचार्याने पट्ट्याने अमानूष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मजुरांनी सदर पोलिस कर्मचार्याविरूध्द जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात मजूर वर्गाचे आपल्या घरवापसीसाठी प्रयत्न सुरू आहे. देशभर बस, रेल्वे आणि खासगी वाहतुक सेवा बंद असल्याने अनेक मजुर वर्ग पायी स्थलांतर करीत आहे. अशा स्थलांतरीत मजुरांना शासनाने अनेक जिल्ह्यात डिटेन करून त्यांना क्वॉरंटाईन करून त्यांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली आहे. नुकतेच जालन्यावरून औरंगाबादकडे रेल्वे रूळावरून पायी निघालेल्या 16 मजुरांना पहाटे झोपेच्या दरम्यान मालगाडीने चिरडल्याची समाजमन सुन्न कराणारी घटना ताजी असतांना खामगाव शहराजवळील घाटपूरी शिवारातील मुलींच्या वस्तीगृहात क्वॉरंटाईन करण्यात आलेले बिहार आणि झारखंड येथील मजुरांना शिवाजीनगर पोलिस स्टेशन मधील पोकॉ बाळकृष्ण पुंडकर या पोलिस कर्मचार्याने काल मध्यरात्री सदर वसतीगृहात येवून 8 ते 10 कर्मचार्यांना विनाकारण पट्ट्याने मारहाण केली. पोलिस कर्मचार्यांच्या मारहाणीत काही मजूर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने येथील सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच एसडीओ मुकेश चव्हाण, एएसपी हेमराज राजपूत, मुख्याधिकारी धनंजन बोरीकर, ठाणेदार हुड यांनी घटनास्थळी पोहोचून मजुरांची भेट घेवून विचारपूस केली.