पत्रकारितेत निपक्ष, निर्भीड, निकोप प्रगती अपेक्षित

0

कविता ठाकरे, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज म्हणजेच ६ जानेवारी रोजी “महाराष्ट्र पत्रकार दिन” साजरा करण्यात येतो. मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र आज म्हणजेच 6 जानेवारी रोजी सुरु केले. म्हणून आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जांभेकर यांचे स्मरण करुन त्यांच्या कार्याचा आढावा घेतला जातो.

गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले.

त्यावेळी इंग्रजी सत्ताधार्‍यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पणमध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे आणि त्याला वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते. मात्र याही काळात पदरमोड करून व कुठलेही नफ्याचे तत्व न स्वीकारता या काळामध्ये सुधारकांनी आपले वृत्तपत्र चालवले यामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र अग्रणी होते. प्रत्यक्षामध्ये या काळातील वृत्तपत्रे ठराविक काळानंतर प्रसिद्ध केली जात असत. 1832 मध्ये सुरू झालेले दर्पण हे वृत्तपत्र 1840 पर्यंत चालले.

गेल्या पावणेदोनशे वर्षांमध्ये महाराष्ट्रात स्वातंत्र्यलढ्यासह अनेक क्षेत्रांमध्ये बदल घडवण्यासाठी पत्रकारितेने योगदान दिलं आहे. आता 21व्या शतकात बदलत्या काळानुसार पत्रकारितेचे स्वरूप, पत्रकार आणि त्यांच्याकडे पाहाण्याची समाजाची दृष्टी यामध्ये काही बदल झाला का, याकडे तटस्थपणे पाहाण्याची वेळ आली आहे.

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून माध्यमांना महत्व दिले जाते. विशेष म्हणजे भारतातील पत्रकारिता ही निपक्ष, निर्भीड तसेच निकोप प्रगती होऊन पत्रकारितेचा गुणवत्तात्मक दर्जा विकसित होणे अपेक्षित आहे. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, शासन आणि जनता यातील दुवा म्हणजे पत्रकार असतो, जो प्रतिकूल परिस्थितीतही सत्य प्रकट करत असतो.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी या दोन पत्रकारांना नोबल शांतता पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. ही बातमी जेव्हा ऐकली तेव्हा मनाला खूप छान वाटलं. अजून पत्रकारितेमध्ये जीव शिल्लक आहे याची जाणीव झाली. कारण सध्या माध्यमांची परिस्थिती खूप वेगळी आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या माध्यमांवर जनतेचा असलेला विश्वास ढासळतांना दिसत आहे. प्रसिद्धी किंवा टीआरपीच्या नावाखाली बातम्यांची विश्वसहार्यता आणि सत्यता कमी होतांना दिसत आहे.

‘देशात निर्भीड स्वतंत्र पत्रकारितेचा अस्त झालाय’. हे अगदी बरोबर आहे. कारण याठिकाणी सत्याला दाबलं जात आहे. सत्तेच्या नावाखाली जनतेचा आवाज दाबल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात तर सामान्य माणूस तर खूप बेजार झालाय. माध्यमांनी राजकारण, करमणूक किंवा इतर क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करून देशापुढे असलेले महत्वाच्या विषयांना प्राधान्य द्यायला पाहिजे.

पत्रकारिता ही नैतिक मूल्यांवर अवलंबून असते. निपक्ष आणि निर्भीड पत्रकारिता करणे, समाजासमोर वास्तविक माहिती मांडणे, दुर्बल घटकांना न्याय मिळवून देणे, माध्यमांचं महत्वाचं काम म्हणजे माहिती देणं, प्रशिक्षण, शिक्षण करणं, मनोरंजन करणं, प्रबोधन करणे. लोकशाहीत माध्यमांचं मोठं महत्व असतं. त्यामुळं ही माध्यमं टिकली पाहिजेत, तसेच त्यांच्या संवर्धनासाठी निर्मळ वातावरण असण्याची गरज आहे.

माध्यमांचं काम सकळजनांना शहाणं करणं असलं पाहिजे, माध्यमांनी समाजाला जागृत करण्याचं व्रत सोडू नये अशीही अपेक्षा असते. पत्रकारांनी लोकशिक्षण करत असताना समाजात नेमकं काय सुरु आहे, त्यावर तटस्थ भाष्य करुन दिशा देणंही अपेक्षित असतं. म्हणून पत्रकारितेला व्यवसाय म्हटलं जात नाही तर त्याला पेशा अर्थात व्रत, वसा समजले जाते. पत्रकारांनी प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता निर्भिडपणे, सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेऊन ज्यांना स्वत:चा आवाज नाही, तर त्यांचा आवाज होऊन त्यांच्या मूक आवाजाला निर्णय कर्त्यांपर्यंत, बहुसंख्याकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं, म्हणून पत्रकारांनी समाजाचा मूकनायक व्हावं.

Leave A Reply

Your email address will not be published.