पतंजलीनं तयार केलं करोनावरील आयुर्वेदीक औषध; आज दुपारी लॉन्च करणार

0

नवी दिल्ली : देशभरात सध्या कोरोनाचा हाहाकार माजला आहे. या धोकादायक व्हायरसमुळे लाखो लोकांचे प्राण गेले आहेत. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी करोनावरील लस शोधण्यावर भर देण्यात येत आहे. अशातच योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं करोनावरील औषध तयार केल्याचा दावा केला आहे. आज पतंजलीचं करोनावरील ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदीक औषध जगासमोर आणणार आहे. कोरोनाशी लढा देणाऱ्यांसाठी ही बातमी कदाचित सर्वात उपयुक्त आहे. आचार्य बालकृष्ण हे आज दुपारी 12 वाजता हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लॉन्च करणार आहेत. बाबा रामदेवही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

पतंजली योगपीठाने दावा केला होता की, त्यांना कोविड – 19 ला रोखण्याचे औषध सापडले आहे आणि ते प्रभावीदेखील ठरले आहे. कोविड – 19 विषाणूविरोधात प्रभावी औषध आणि लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनलॉक सुरू झाल्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. जर पतंजली योगपीठाचा दावा खरा ठरला तर देशातील लाखो लोकांना मोठी मदत मिळणार आहे. शिवाय अर्थव्यवस्थाही पुन्हा रुळावर येऊ शकेल.

दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध शोधल्याचा तसंच ते प्रभावीदेखील ठरत असल्याचा दावा पतंजलीकडून करण्यात आला होता. पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी हे औषध तयार केलं आहे. तसंच आज लाँचदरम्यान बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण हे वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यातील निकाल सर्वांसमोर ठेवणार आहेत. सध्या या औषधाचं उत्पादन हरिद्वारमधील दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.