नवी दिल्ली :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली आहे. दरम्यान यावेळी अक्षय कुमारने मोदींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्यांदाच अक्षयने मोदींची मुलाखत घेतली असून यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच छोट्या-मोठ्या गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत.
आजपर्यंत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय मुद्द्यांवर अनेक भाषणं आणि मुलाखती देताना पाहिलं आहे. पण या मुलाखतीत अक्षयने मोदींना त्यांच्या झोपेविषयी प्रश्न विचारला. ‘तुम्ही फक्त ३ ते ४ तासच का झोपता?,’असा प्रश्न त्याने विचारला. यावर मोदी म्हणाले, ‘मला अनेकजण हा प्रश्न विचारतात. इतकंच नव्हे तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीसुद्धा मला झोपेविषयी प्रश्न विचारला होता. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. एकमेकांशी एकेरी भाषेतच आम्ही बोलतो. इतके कमी तास झोपून तू स्वत:चं नुकसान करतोयस असं ते म्हणायचे. पण माझ्या शरीराला तशी सवयच लागली आहे. ३ ते ४ तासांत माझी झोप पूर्ण होते. इतकीच माझी झोप आहे आणि ही सवय मला खूप आधीपासून आहे.’
पंतप्रधान मोदींना राग येतो का, सोशल मीडियावरील मीम्सवर त्यांची प्रतिक्रिया काय असते, विरोधी पक्षांसोबत त्यांचं नातं कसं असतं अशा विविध प्रश्नांवर त्यांनी मनमोकळेपणाने या मुलाखतीत उत्तरं दिली आहेत.