सातारा : गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या आश्वासनाला जनता फसल्याची टीका सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस, महाआघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारा निमित्त निगडी प्राधिकरण इथं उदयनराजे भोसले यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
पाच वर्षात नरेंद्र मोदी यांनी फक्त ‘मन की बात’ केली. एवढा मोठा अभिनय मी कधीच बघितला नव्हता. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये देऊ, अशी खोटी आश्वासने देऊन जनतेची त्यांनी फसवणूक केली. लोकांनी देखील त्यांच्यावर विश्वास ठेऊन प्रचंड बहुमत दिले. मात्र सत्तेत विराजमान झाल्यानंतर त्यांनी जनतेकडेच पाठ फिरवली. ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका त्यांनी घेतली. जनता हाच लोकशाहीतला राज आहे.
‘देशाच्या स्वातंत्र्यसाठी कोणाचा भाऊ, वडील शहिद झाले. मात्र गेल्या पाच वर्षात या देशाची बिकट अवस्था सरकारने केली आहे. यांना केवळ तुमचं मत हवं आहे. तुमच्या विचारांची किंमत यांनी ठेवली नाही. लोकांनी विश्वास ठेवला ही त्यांची चूक झाली. भाजप-शिवसेना सरकारने केसांनी लोकांचा गळा कापला असल्याचा घणाघाती टिका उदयनराजे यांनी केली.