मुंबई : पंढरपुरातील चैत्र वारी सोहळात कोरोनाचे विघ्न आल्याने यंदा वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व उत्सव, सोहळे रद्द करण्यात आल्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना सांगितले.
देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात जास्त आहे. अशावेळी आजाराचा फैलाव रोखण्यासाठी लोकांनी एका ठिकाणी जमा न होणं गरजेचं आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन सांगितले आहे. अशावेळी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. पुढील काही दिवस या नियमांचे पालन करणे गरजेचे असून सर्व सण-उत्सव घरच्या घरी साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. यंदा गुढीपाडवाही नागरिकांनी घरच्या घरीच साजरा केला. त्यानुसार राज्यातील सर्व सोहळे घरात साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. याशिवाय यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या अराध्य दैवत विठ्ठलाच्या भेटीसाठी शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या चैत्र वारी रद्द केल्याचे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मंदिर समितीने दि.17 मार्च ते 31 मार्च अखेर श्री विठ्ठल -रुक्मिणीमातेचे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तो वाढवून आता 14 एप्रिलपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. मात्र देवाची नित्यपुजा सुरु राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.