95 हजार रूपये लुबाडले : तरूणाला दिले बनावट नियुक्तीपत्र : एलसीबीकडे करणार तक्रार
जळगाव, दि.18 –
शहरात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढतच आहे. नवीन कंपन्या जिल्ह्यात येत नसल्याने तरूणांना नोकरीसाठी धडपड करावी लागत आहे. जळगाव खुर्दे येथील फार्मसीस्ट असलेल्या एका तरूणाने नोकरीसाठी ऑनलाईन जॉब पोर्टलवर अर्ज केल्यानंतर त्याला एका व्यक्तीचा फोन आला. विविध कारणे देत आणि नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र पाठवून त्याच्याकडून 95 हजार रूपये लुबाडले आहे.
जळगाव खुर्दे येथील तरूण पराग चंद्रकांत पाटील वय-30 यांचे फार्मसीचे शिक्षण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते नोकरीच्या शोधार्थ होते. महिन्याभरापूर्वी त्यांनी नोकरी डॉट कॉम कंपनीवर स्वतःचा रिझ्युमे अपलोड केला होता.
4 कारणांनी घेतले पैसे
ऑनलाईन अर्ज केल्यानंतर काही वेळाने दिल्ली येथून रणजित सिंघानिया नामक व्यक्तीचा परागला फोन आला. नोकरीची चांगली संधी असल्याचे सांगत त्या व्यक्तीने नोंदणीसाठी 2 हजार 100 रूपये भरण्यास सांगितले. पराग यांनी दि.13 एप्रिल रोजी 2100 रूपये सतिष राज नामक व्यक्तीच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात भरले. त्यानंतर डॉक्युमेंटनसाठी 7 हजार 200 रूपये, तीन महिन्यांनी परत भेटेल असे सांगून सुरक्षा अनामत म्हणून 26 हजार रूपये, वर्षभरानंतर परत देण्यात येतील असे सांगत अॅग्रीमेंट रक्कम म्हणून 66 हजार रूपये बँक खात्यात किंवा ओटीपी कोड पाठवून सिंघानिया याने ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले.
विम्यासाठी 75 हजारांची मागणी
पराग पाटील यांच्याकडे सिंघानिया हा गेल्या तीन दिवसापासून नोकरीसाठी आवश्यक विमा काढण्यासाठी 75 हजारांची मागणी करीत आहे. सध्या पैसे नसल्याचे सांगत पाटील यांनी त्यास टाळाटाळ केली असता तुमचे नियुक्तीपत्र घेवून मी स्वतः येईल असे त्याने सांगितले.
एलसीबीकडे करणार तक्रार
पराग पाटील यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बुधवारी ते तक्रार देण्यासाठी दुपारी जिल्हापेठ पोलिसात आले होते. पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना स्थानिक गुन्हे शाखेत तक्रार करण्याचे सांगितले. पाटील हे एलसीबीच्या निरीक्षकांकडे तक्रार नोंदविणार असल्याचे त्यांनी लोकशाहीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.