नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त करण्यासाठी योजना आखल्यावर नेमकं त्या रात्री काय घडलं, याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना दिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आम्ही असं नियोजन करत होतो की आम्ही हल्ला करु पण पाकिस्तानला तोंड उघडता येणार नाही. हवाई हल्यावेळी एकीकडे पाकिस्तानी जनतेच्या भल्याचा आम्ही विचार केला तर दुसरीकडे दहशतवाद्यांच्या तळांना टार्गेट करायचे आमचे ठरले होते. त्यादृष्टीने सगळं नियोजन करण्यात आलं. या सर्व प्रक्रियेत मी बारकाईने लक्ष देत होतो. मला माहीत होतं रात्री 1 वाजता वायूदलाचे जवान पाकिस्तानात घुसणार आहेत. माझे जवान आपला जीव धोक्यात घालून स्ट्राईक करुन पुन्हा येईपर्यंत मला झोप नव्हती, अशी माहिती त्यांनी दिली
मी कधीही राजकीय विचार करुन निर्णय घेतले नाहीत. ज्या रात्री बालकोट भागात एअर स्ट्राईक करण्यात येणार होतं. तेव्हा मी त्यावर लक्ष ठेवून होतो. जवान किती वाजता निघणार? किती वाजता हल्ला होणार? हे सगळं मला माहीत होतं. जवानांनी एअर स्ट्राईक केल्यानंतर पहाटे 4 वाजता मला फोन आला, काम फत्ते झालं आपले जवान सुखरुप परत आले तेव्हा मी सुटकेचे निश्वास सोडला. त्यानंतर मी लगेच अधिकाऱ्यांना फोन करुन बैठक बोलवली होती. सकाळी 7 वाजता पुढील नियोजनासाठी माझ्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली असही मोदींनी सांगितले.
बालाकोटमध्ये केलेल्या हल्ल्याचा पुरावा विरोधकांकडून वारंवार मागितले जात आहेत, या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.