नवी दिल्ली :- निवडणूक आचार संहिता लागू झाल्यानंतर केवळ भाजप आणि मोदींचा एकतर्फी प्रचार करण्यासाठी ‘नमो टीव्ही’ चॅनल ही दूरचित्रवाणी वाहिनी सुरू करण्यात आली होती. या वाहिनीला मोदींचेच नाव देण्यात आले असून त्याच्या लोगोवरही केवळ मोदींचाच फोटो वापरण्यात आला होता. मात्र, निवडणुका संपताच वादग्रस्त ‘नमो टीव्ही’ हे चॅनल दूरचित्रवाणीवरुन गायब झालं आहे. ‘नमो टीव्ही’वरून केवळ भाजपाशी संबंधित कार्यक्रम प्रसारित केले जात होते. या चॅनलला भाजपाकडून निधी पुरवठा होत असल्याचा आरोप सातत्याने झाला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबताच या चॅनचलं प्रसारण देखील बंद झालं आहे.
देशातील सर्व डीटीएच कंपन्यांकडून या वाहिनीचे प्रसारण सुरू करण्यात आले होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेबसाईटवर देशात अधिकृतपणे मंजूर करण्यात आलेल्या खासगी वाहिन्यांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. पण या यादीत नमो वाहिनीचे नाव नसल्यामुळे अनेक राजकीय पक्षांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.