भाजप कार्यकर्त्यांची मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याची ईच्छा
जळगाव ;– भारतीय जनता पक्ष हा संघटनेच्या जोरावर देशातील एक नंबरचा पक्ष झाला आहे. एकीकाळी दोन खासदार असलेला हा पक्ष आज विश्वातला ताकदवान पक्ष झाला आहे. आगामी काळात निवडणुकांसाठी बुथ रचना मजबुत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. संघटनेच्या जोरावरच जळगाव महापालिकेत सत्ता काबीज करा,असे आवाहन प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी भाजपाच्या बैठकीत दिली .
दरम्यान महापालिकेची निवडणूक ही स्वबळावरच लढवावी, अशी भावना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुराणिक यांच्यासमोर शनिवारी एका बैठकीत मांडली.
भारतीय जनता पक्षाच्या महानगर आघाडीची बैठक प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली वसंतस्मृती कार्यालयात पार पडली. यावेळी आ.राजूमामा भोळे, आ.स्मिता वाघ, अॅड.किशोर काळकर, डॉ.सुरेश सुर्यवंशी, सुभाष शौचे, कंवरलाल संघवी, दीपक सूर्यवंशी, राजू मराठे, विनोद मराठे, राहुल वाघ, सुशिल हासवानी, गटनेते सुनील माळी, नगरसेविका उज्वला बेंडाळे, शुचिता हाडा, महेश जोशी, प्रदीप रोटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांमधून युतीविषयी नाराजी
महापालिका निवडणुकीसाठी युती करण्याच्या हालचाली सुरु आहेत. कार्यकर्त्यांमधून मात्र युतीविषयी नाराजी आहे. ही नाराजी आज बैठकीत देखिल दिसून आली. बैठकीत गटनेते सुनील माळी यांनी सांगितले की, आगामी महापालिकेची निवडणुक ही स्वबळावरच लढविण्यात यावी.
त्यामुळे कार्यकर्त्यांना देखील संधी मिळेल. गटनेते सुनील माळी यांच्या या मागणीला कार्यकर्त्यांनी देखील साथ देवून महापालिकेची निवडणूक ही स्वबळावरच लढवा, अशा भावना प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्यासमोर मांडल्या. प्रास्ताविकातून आ.राजूमामा भोळे यांनी शहरातील 382 बुथची माहिती सादर केली.महानगर बैठकीच्या आधी दुपारी प्रदेश संघटनमंत्री पुराणिक यांनी जिल्ह्याचा संघटनात्मक आढावा घेतला. पुढीलवर्षी होवु घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संघटनात्मक बळकटीसाठी बुथ रचनेवर भर द्या, अशी सूचना केली.