निधी उपलब्ध मात्र रुग्णवाहिका चालकांचे हात कोरडेच!
मार्गदर्शनाच्या फेऱ्यात अडकला पगार
जळगाव प्रतिनिधि
जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका चालकांचे गेल्या चार महिन्यांपासूनचे वेतन थांबल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. मार्च महिन्यात जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध झालेला आहे मात्र ‘मार्गदर्शना’च्या फेऱ्यात हा निधी अडकून पडल्याने चालकांचे हात कोरडेच आहेत..
न्यायालयाने चालकांच्या बाजूने निर्णय देवूनही पगार होत नसल्याने चालक हतबल झालेले आहेत. न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्टता केलेली नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आरोग्य सेवा आयुक्तालयाकडे मार्गदर्शन मागितले आहे. लवकरच पगार देण्यात येतील असे आयुक्तालयाकडूनही सांगण्यात येत असले तरी पगारासाठी चालकांना तारीख पे तारीखच मिळत आहे. जिल्ह्याभरातील 102 रुग्णवाहिका चालकांचे पगार गेल्या चार महिन्यांपासून थकले असतांनाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चालढकलीचे धोरण स्विकारल्याने रुग्णवाहिका चालक संतप्त झाले आहेत.
पगार द्यायचा कसा?
रुग्णवाहिका चालक न्यायालयात गेले असता न्यायालयाने पगार करण्याचे आदेश दिले असले तरी ते कशा स्वरुपात द्यावेत याची स्पष्टता नसल्याने अधिकारी देखील संभ्रमात आहेत. चालकांना पेरोल पगार द्यायचा की नाही याबाबत आदेश नसल्याने पगार लांबणीवर पडले आहे. चालकांना पगार कुठल्या आधारावर द्यावा हे अधिकाऱ्यांना लक्षात येत नाही.
” रुग्णवाहिका चालकांच्या पगारासाठीचा निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध झालेला आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पगार द्यायचा का? या बाबत वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात याबाबत पत्रव्यवहार झालेला असून आदेश आल्यानंतर पगार काढले जातील.”
– सचिन भायेकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी,
जि.प, जळगाव