रावेर;- : तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेत दोन हेल्मेटधारी मोटारसायकलस्वार दरोडेखोरांनी दरोड्याच्या प्रयत्नात सहाय्यक शाखा व्यवस्थापक करणसिंग नेगी यांची गोळी झाडून निर्घृण हत्या करून पोबारा केला होता. दरम्यान, आरोपींची माहिती देणाऱ्यास जळगाव पोलिसांनी अखेर एक लाख रुपये इनाम घोषित केले आहे.
१८ जून रोजी दुपारी २:२० वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेतील हेल्मेटधारी मोटारसायकलस्वार एक दरोडेखोर विजया बँक शाखेत एक दिवस आधी हेरगिरी करून गेल्याचे आढळून आले आहे. संबंधित आरोपींनी घटनेच्या पूर्वीपासून तर थेट पसार होईपर्यंत मोबाइलचा वापर न करण्याची खबरदारी घेतल्याने सदरील आरोपी सर्राईत तथा व्यावसायिक असल्याचा पोलिसांचा एक मतप्रवाह दिसून येतो, तर आरोपींनी बँकेतून रक्कम लंपास न करताच पलायन करताना झाडलेल्या गोळीत सहाय्यक शाखा व्यवस्थापक करणसिंग नेगी यांची हत्या झाल्याने सदरील आरोपी हे सराईत नसल्याचा पोलिसांचा दुसरा मतप्रवाह आहे.
मोबाइलच्या ध्वनीलहरींच्या कार्यक्षेत्रात आरोपींचा कोणताही संपर्क आढळून येत नाही, तर मयताच्या मोबाइल कॉल रेकॉर्डमध्ये कोणताही धागा गवसत नसल्याने पोलीस तपासात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंंजाबराव उगले यांनी निंबोल बँक दरोड्याच्या प्रयत्नात खून करणाºया आरोपीचे नाव निंभोरा पोलिसात वा स्थानिक गुन्हे शाखेला कळवणाºयास एक लाख रुपये इनाम घोषित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रोहम यांनी घटनास्थळी धाव घेऊन दरोड्याच्या प्रयत्नात झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील सर्व कंगोरे तपासण्यासाठी तब्बल ७२ तास ठिय्या मारून नियोजनबद्ध बैठका घेऊन तपासचक्र फिरवले.