नाशिक: नाशिकच्या खुटवडनगर परिसरात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एका कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर लागलेल्या आगीत घरातील वस्तू जळून खाक झाल्या असून मोठं नुकसान झालं आहे.
खुटवड नगर परिसरातील धनदायी कॉलनी येथे प्लॉट नंबर १२६ येथे सकाळी सातच्या सुमारास गॅस गळतीमुळे सिलेंडरला आग लागून भीषण स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या घरांच्या आणि गाड्यांच्या काचा फुटल्या. या स्फोटात घरमालक बळीराम पगार, त्यांची पत्नी पुष्पा पगार, आणि नातू रुहान हे जखमी झाले.
स्फोट झाल्या झाल्या आजूबाजूच्या नागरिकांनी तिथं धाव घेतली. तसंच, अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनास्थळी अंबड पोलीस पंचनामा करीत आहेत. स्फोटामध्ये घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या असून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.