नाशिक : मालेगावमधील करोनाच्या रूग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे. रविवारी सकाळी मालेगावमध्ये पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता त्यात भर म्हणून दुपारी १२ वाजता आणखी १३ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मालेगावात दिवसभरात १८ नवे करोचे रूग्ण आढळले आहेत.
आजच्या १८ नव्या रूग्णांमुळे मालेगावातील करोना बाधितांची संख्या २७ झाली आहे. त्यापैकी मालेगाममधील एका करोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. मालेगावमुळे नाशिक जिल्ह्याच्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. नाशिकमध्ये करोनाबाधितांची एकूण संख्या ३२ झाली आहे. नाशिक शहरात तीन, निफाड आणि चंदवडमध्ये प्रत्येकी एक-एक रूग्ण आढळला आहे. निफाडमधील एक रूग्ण पुर्णपणे बरा झाल्यामुळे त्याला होम क्वारंटाइनमध्ये पाठवण्यात आलं आहे.
मालेगाव मधून सातत्याने करोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहे मागील तीन दिवसांमध्ये मालेगाव मधून २७ नवे रुग्ण समोर आल्याचे धक्कादायक चित्र आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्ण मालेगावमध्ये आहेत. रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे चार दिवस पूर्णतः लॉकडाउन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.