नाशिक : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशकात शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. नाशिकमधील शिवसेनेच्या 350 पदाधिकाऱ्यांसह 36 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात फूट पडली असून शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदेंच्या पाठीशी बळ उभे करण्यासाठी राजीनामा देण्यात आला आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघ भाजपला सोडल्याने नगरसेवकांसह सर्व पदाधिकारी नाराज झाले होते. या नाराजीतून त्यांनी राजीनामा दिला आहे.
दरम्यान, आज ३६ नगरसेवक आणि ३५० पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पदाचे राजीनामे दिले असून शिवसेनेचे गटनेते आणि बंडखोर उमेदवार विलास शिंदे यांना पाठींबा दिला आहे. मतदानाला काही दिवस शिल्लक असताना हा प्रकार घडल्याने महायुतीतील भाजपाच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नाशिक पश्चिममधील शिवसेनेची बंडखोरी रोखून नेत्यांची मनधरणी करण्यात भाजप नेते आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपयश आलं आहे. सिंधुदुर्गानंतर आता नाशिकमध्येही शिवसेना-भाजप युतीला झटका बसला आहे.
नाशिक : शिवसेना आणि भाजपाला राज्यात बंडखोरांचा मोठा फटका बसताना दिसत आहे. बाहेरच्या पक्षातून आयात केलेल्या नेत्यांना उमेदवारी दिल्याने पक्षात बंडखोरी वाढल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. अनेकांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले असून त्यांची बंडखोरी शमवण्यात शिवसेना-भाजपाला अपयश आले आहे. बंडखोर आपल्या निर्णयावर ठाम असल्याने पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे. नाशिक शहरात महापालिकेतील 35 शिवसेना नगरसेवकांची बंडखोरी केल्याचे समोर येत आहे.