रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील सावखेडा खुर्द येथील तरुण शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून राहत्या घराच्या पंख्याला फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २५ रोजी उघडकीस आली. प्रमोद हरी बखाल (वय ३५) या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.दरम्यान, याप्रकरणी सावदा पोलिस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावखेडा खुर्द येथील रहिवासी शेतकरी प्रमोद बखाल या शेतकऱ्याने दि २५ रोजी दुपारी बारा वाजता त्यांच्या राहत्या घरी पंख्याला दोरी बांधून फाशी घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी लगेचच त्यांना रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले .तिथे त्यांना डॉक्टर एन डी महाजन यांनी तपासून मृत घोषित केले. प्रमोद बखाल हे शेती करीत असत. त्यांचे सहा महिन्यांपूर्वी उभी असलेली केळीची बाग उध्वस्त झाली होती .त्यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर त्यांनी हे नुकसान सहन करत शेतामध्ये कपाशी पेरणी केली व यावेळेसही अवकाळी पावसामुळे त्यांचे कपाशीचेही भलेमोठे नुकसान झाले. या शेतीच्या पेरणी करण्याकरता त्यांनी नातेवाइकांकडून पेरणीसाठी उसनवारीने पैसे घेतले होते. त्यात त्यांचे भरपूर नुकसान झाले. त्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे नातेवाईकांचे उसनवारीचे पैसे कसे परत करायचे ?व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, तसेच मुलांचे शिक्षण कसे करायचे? या विवंचनेतच ते बऱ्याच दिवसांपासून होते. या विवंचनेतच त्यांनी आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात होते. प्रमोद बखाल यांच्यासारख्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने सावखेडा गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. तसेच शासनाने सत्तास्थापनेचा खेळ थांबवून जरा शेतकऱ्यांकडे व झालेल्या नुकसानीकडे लक्ष देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.
प्रमोद बखाल यांची पत्नी दिनांक २५ रोजी शेतामध्ये गेल्या होत्या व व दोन्ही मुले शाळेत गेली होती घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत त्यांनी राहत्या घरात फाशी घेत आत्महत्या केली.त्यांच्या पश्चात आई ,पत्नी ,दोन लहान मुले ,भाऊ असा परिवार आहे. रावेर येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर एन डी महाजन यांनी शवविच्छेदन केले.
सावदा पोलिस स्टेशनला प्रदीप पुंडलिक बखाल यांच्या खबरी वरून अ. मृ.नं. २२/२०१९ सी आर पी सी १७४ प्रमाणे से. ज.नं ३२९/१९ र.नं.१९वर १४७९ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास एपीआय राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, देवेंद्र पाटील ,युसुफ तडवी हे करीत आहेत.