जळगाव ग्रामीण मधील चंद्रशेखर अत्तरदे यांची बंडखोरी भाजपासाठी डोकेदुखी
जळगाव –
जळगाव ग्रामिण मतदारसंघात भाजपाचे चंद्रशेखर अत्तरदे यांची बंडखोरी भाजपासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. भाजपाचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणत सर्व नेत्यांचा वापर करून प्रचार सुरू केल्यामुळे श्री.अत्तरदे यांच्या बंडखोरीला भाजपाने पुरस्कृत केले आहे काय? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. श्री. अत्तरदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एकनाथराव खडसे यांचे अर्शिवाद घेतल्यामुळे गिरिश महाजन यांना आव्हान देण्यासाठीच तर ही उमेदवारी नाही ना? अशीही चर्चा आता मतदारसंघात सुरू आहे.
राज्यात भाजपा-शिवसेनेची यूती असून उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी भाजपाने संकटमोचक अशी प्रतिमा असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपविली आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी श्री.महाजन यांचे प्रचंड जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे सर्वश्रृत आहे. गिरिश महाजन यांच्या शब्दाखातरच लोकसभा निवडणूकीत गुलाबराव पाटील आणि शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेतली होती. या कामाची पावती विधानसभेत शिवसेनेला मिळेल असे वाटत असतांनाच जळगाव ग्रामिण मधून शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांच्याविरूध्द भाजपाचे चंद्रशेखर अत्तरदे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आणि कायम ठेवला. भाजपातील खडसे समर्थक गट आणि गुलाबराव यांच्यातील वितृष्ट सर्वश्रृत आहे. यावेळी भाजपाकडून यूती धर्माचे पालन होईल असे वाटत असतांनाच खडसे समर्थक गटाने श्री.अत्तरदे यांची उमेदवारी काय ठेवून ही भाजपाची अधिकृत बंडखोरी असल्याचे चित्र निर्माण केले आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
गुलाबराव पाटील यांना शह देण्याच्या नादात चंद्रशेखर अत्तरदे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांनाच आव्हान दिल्याची चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे. श्री.अत्तरदे यांच्या उमेदवारीला गिरीशभाऊंचाही पाठिंबा आहे काय? शिवसेनेच्या उपनेत्याला खिंडीत गाठण्याचा हा प्रकार तर नाही? अशक्य वाटत असलेला गुलाबरावांचा पराभव झाला तर याला गिरीश महाजन यांनाच जबाबदार ठरविण्यासाठी तर ही खेळी नाही ना? जिल्ह्यातील शिवसैनिक आणि शिवसेनेला मानणार्यांच्या नजरते ना.महाजन यांना खलनायक ठरविण्यासाठीच तर अधिकृत बंडखोरीचा प्रचार श्री.अत्तरदे यांच्याकडून ठरवून केला जात नाही ना? असे अनेक प्रश्न मतदारसंघात उपस्थित केले जात आहेत.
ना.महाजन आणि ना.गुलाबराव यांचे घनिष्ठ संबंध पहाता श्री.अत्तरदे यांच्या बंडखोरीला ना. महाजन पाठिंबा देतील असे प्रथमदर्शनी तरी वाटत नाही. मात्र, मुक्ताईनगरात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या बंडखेरीचे पडसाद जळगाव ग्रामिणमध्ये पडल्याचा दावा श्री.अत्तरदे समर्थक करीत आहेत. मात्र, मुक्ताईनगरसाठी गिरिश महाजन ग्रामीणमध्ये गुलाबरावांना अपशकून करण्याची शक्यता कमीच आहे.
यासर्व परिस्थितीत चंद्रशेखर अत्तरदे यांच्या बंडखोरीला ना. महाजन यांच्यापेक्षा मुक्ताईनगरचे नाथाभाऊ यांचाच आर्शिवाद असल्याचे मानले जात आहे. नाथाभाऊंनी चंद्रशेखर अत्तरदे यांचा खांदा वापरून आपले राजकीय वैरी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या वर निशाणा साधल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. परिणामी गुलाबरावांच्या विरोधात असलेली चंद्रशेखर अत्तरदे यांची उमेदवारी गिरिश महाजन यांच्यासाठीच आव्हान आहे. श्री.महाजन यांच्या स्थानिक जिल्ह्यातच यूती बाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण करायचा हा डाव आहे. परिणामी गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी येणार्या दिवसांमध्ये गिरिश महाजन यांनाच रिंगणात उतरावे लागणार आहे. श्री.अत्तरदे यांच्या उमेदवारीला आपला पाठिंबा नाही हे स्पष्ट करण्यासाठी दृश्य स्वरूपाची ठोस पावले उचलली तरच भविष्यात युती अधिक भक्कम होण्यास मदत होईल हे विशेष.
विजय यूतीचाच होणार…
षडयंत्राचे राजकारण आपण कधीच केले नाही. जे पोटात तेच माझ्या ओठांवर असते. निवडणूक जिंकायची तर समोर विरोधी उमेदवार राहणारच! आखड्यात उतरल्यावर मल्ल कोण याचा विचार करणार्यांमधला मी नाही. भाजपाचा धरणगाव तालुक्यातील एक गट नेहमीच माझ्याविरूध्द असतो. थेट लढतीत मी त्यांना चारही मुंड्या चित केले आहे. त्यांची ताकद नाही म्हणून त्यांनी दुसर्याला लंगोट बांधून रिंगणात उतरविले आहे. मात्र, भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता माझ्या सोबत आहे. लोकसभेत शिवसेनेने केले काम या कार्यकर्त्याने पाहिले आहे. म्हणूनच मला यूतीच्या विजयाची खात्री आहे. गिरिश महाजन अथवा भाजपाचा कोणताच नेता बंडखोरांच्या पाठीशी नसून जिल्ह्यात यूतीला 100 टक्के यश मिळेल असा विश्वास जळगाव ग्रामीणचे शिवसेनेचे उमदेवार ना.गुलाबराव पाटील यांनी लोकशाहीशी बोलतांना व्यक्त केला.