नाताळ–नववर्षाच्या सुट्ट्यांत साईंच्या चरणी विक्रमी दान

0

नाताळ–नववर्षाच्या सुट्ट्यांत साईंच्या चरणी विक्रमी दान

आठ दिवसांत २३ कोटींहून अधिक रक्कम अर्पण

शिर्डी (प्रतिनिधी) : नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यासह देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविकांनी शिर्डी गाठली. या कालावधीत साईबाबांच्या दर्शनासाठी अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली असून, गेल्या आठ दिवसांत तब्बल आठ लाखांहून अधिक भाविकांनी साईंच्या चरणी माथा टेकवला.

या गर्दीचा परिपाक साईसंस्थानला मिळालेल्या विक्रमी दानातून स्पष्टपणे दिसून आला आहे. साईबाबांच्या चरणी अवघ्या आठ दिवसांत तब्बल २३ कोटी २९ लाख २३ हजार ३७३ रुपये इतके दान जमा झाले आहे. यामध्ये विविध माध्यमांतून आलेल्या देणग्यांचा समावेश आहे.

संस्थानच्या देणगी काऊंटरवरून ३ कोटी २२ लाख ४३ हजार ३८८ रुपये, तर पीआरओ सशुल्क दर्शन पासच्या माध्यमातून २ कोटी ४२ लाख ६० हजार रुपये जमा झाले आहेत. दक्षिणा पेटीतून ६ कोटी २ लाख ६१ हजार ६ रुपये तर डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाइन देणगी, धनादेश, डीडी व मनीऑर्डरद्वारे १० कोटी १८ लाख ८६ हजार ९५५ रुपये साईंच्या चरणी अर्पण करण्यात आले.

रोख रकमेबरोबरच भाविकांनी सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तूंचेही दान केले आहे. यामध्ये २९३.९१० ग्रॅम सोने (अंदाजे ३६ लाख ३८ हजार ६१० रुपये) तसेच ५,९८३.९७० ग्रॅम चांदी (अंदाजे ९ लाख ४९ हजार ७४१ रुपये) यांचा समावेश आहे. याशिवाय २६ देशांच्या परकीय चलनातून १६ लाख ८३ हजार ६७३ रुपये दान स्वरूपात प्राप्त झाले आहेत. भाविकांनी अर्पण केलेला सुवर्णजडित हिरे मुकुट सुमारे ८० लाख रुपये किमतीचा असल्याची माहिती देण्यात आली आहे.

देणगी मोजणीदरम्यान टोपल्या, बादल्या आणि बास्केटमध्ये भरलेल्या नोटांचे दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून, साईभक्तीचे हे दृश्य भाविकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

नाताळ व नववर्षाच्या सुट्ट्यांच्या काळात साईंच्या चरणी भाविकांनी विक्रमी दान केल्याचे स्पष्ट झाले असून, साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी माध्यमांना ही माहिती दिली. या दानातून साईभक्तांची श्रद्धा आणि विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.