मंत्रीमंडळात समावेशाच्या हालचाली : पुन्हा वाईटाचाच घ्यावा लागणार वाटा
*दीपक कुळकर्णी*
जळगाव, दि. 23 –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विडा उचललेल्या कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या मुर्तस्वरुपासाठी भाजपाला एकनाथराव खडसे नावाचे अस्त्र पुन्हा उगारण्याची वेळ आली आहे. सध्या मंत्रीमंडळाच्या बाहेर असलेले श्री. खडसे यांना आगामी काळात होवूू घातलेल्या विस्तारात समावेश देवून प्रकल्पाची जबाबदारी देवून मैदानात उतरविण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. भाजपाविरुद्ध सर्व पक्ष असा संघर्ष नाणार प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात होत असून त्यावर रामबाण उपाय म्हणून खडसेंना पुढे करण्याची शक्यता आहे.
कोकणात होवू घातलेला नाणार प्रकल्पावरुन सध्या भाजपाविरुद्ध सर्वच पक्षंनी दंड थोपटून विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पामुळे शेतकर्यांच्या जमिनी संपादीत होणार असून हा मुद्दा शिवसेनेने कळीचा बनवित त्याला विरोध सुरु केला आहे. महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाने स्थानिकांना हाताशी धरुन भूसंपादनाला, मनसेने स्थानिक रोजगार प्रश्न हाती घेत तर राष्ट्रवादीने शेतकर्यांचा किल्ला लढवित विरोधाची धार तीव्र केली आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तेथे जात शेतकर्यांशी चर्चेचे गुर्हाळ देखील सुरु केले आहे. भाजपासाठी हा प्रकल्प करो या मरोचा झाला असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांवर जोर टाकला आहे. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस हे प्रकल्प होणारच अशी गर्जना करीत असले तरी सर्व पक्षीय विरोध पाहता त्यांनाही काही मर्यादा येत असल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना पुढे करुन हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरु आहे.
खडसे नावाचे अस्त्र
खडसे हे एकमेव शस्त्र भाजपाकडे असून ते कुठल्याही पक्षाशी वा नेत्याशी शाब्दीक लढाई करुन प्रकल्पाला मूर्तरुप देवू शकतात. हा अभ्यास भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरुन झाला आहे. सुरुवातीपासूनच खडसे विरुद्ध शिवसेना, मनसे असा राजकीय आखाडा रंगला आहे. युतीचे दोन तुकडे करण्याचा शिवधनुष्य देखील खडसेंनीच उचलला होता. तर मनसेवर टीका करण्याची संधी खडसे सोडत नाहीत. तिकडे काँग्रेसच्या नेतृत्वाला शह देण्याची धमक खडसेंमध्ये आहे तर राष्ट्रवादीच्या तत्कालीन भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन खडसे राष्ट्रवादीला जनतेच्या अदालतीत उभे करु शकतात त्यासाठीच भाजप नेतृत्व खडसेंना पुढे करण्याच्या तयारीत आहेत.
आगामी काळात निवडणुकांचा माहौल असल्याने भाजपाला जशास तसे उत्तर देण्याची तयारी करावी लागणार आहे. फडणवीस हे स्वत: कुणाला अंगावर घेण्याच्या तयारीत नसतात तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याची विरोधक खिल्ली उडवित असतात. एकनाथराव खडसे यांचा विधीमंडळातील दांडगा अनुभव, विविध विषयांची असलेली जाण, विरोधकांवर थेट चढवित असलेला हल्ला आणि मंत्रीमंडळात पुन्हा समावेशाच्या पल्लवित झालेल्या आशा अशा विविध मुद्यांमुळे भाजपाला खडसे नावाचे अस्त्र या प्रकल्पासाठी पुढे करावे लागणार आहे.
विविध आरोप अन् सहीसलामत सुटका…
भाजपाच्या मंत्रीमंडळात नंबर दोनचे मंत्री म्हणून श्री. खडसे यांचा दबदबा राहिला आहे. महसूलमंत्री असताना त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप निरर्थक असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले असून खडसेंना सार्याच मुद्यांमध्ये क्निन चीट मिळालेली आहे. खान्देशात भाजपाच्या वाढीसाठी खडसे यांनी उपसलेले कष्ट लक्षात घेता त्यांना पुन्हा मंत्रीमंडळात घेण्याच्या हालचाली गतीमान झाल्या असल्या तरी शेवटी खडसेंना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेसोबत वाईटाचाच वाटा घ्यावा लागणार आहे.
स्पष्ट वक्ता… विकासाचे व्हिजन
आजपर्यंत श्री. खडसे हे विविध खात्यांचे मंत्री म्हणून राहिले असताना त्यांनी विकासाचे व्हिजन राबविले आहे. भूसंपादनाला गत काळात झालेला विरोध त्यांनी त्यांच्या पद्धतीने मवाळ केला असून प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आहे. तोच कित्ता नाणार प्रकल्पात खडसे गिरवतील आणि तेथील विरोध मावळेल अशी आशा भाजप वरिष्ठांना असून त्यासाठीच ते खडसे नावाचे अस्त्र वापणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
श्रेष्ठी निर्णय घेतील
खान्देशात भाजप वाढविण्यासाठी मी कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. पक्षाला आज जे यश मिळत आहे, ते कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. माझा मंत्रीमंडळातील समावेशाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, पक्षाने घेतलेला निर्णय माझ्यासाठी आदेशाच आहे. भाजप विकासाचे व्हिजन राबवित आहे. मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार आहे, त्या संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील.
– एकनाथराव खडसे,
ज्येष्ठ नेते, माजी मंत्री भाजपा