नदी-नाल्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी ग्रामपंचायतींनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घ्यावा -जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

0

जळगाव | प्रतिनिधी
दिवसेंदिवस नदी-नाल्यांची झीज झाल्यामुळे नदी-नाल्यांचे पात्र ओस पडले आहे. यामुळे नद्यांमधील पाण्याचे प्रमाणही कमी होत आहे. दुतर्फा वृक्षारोपणाने भविष्यात वृक्षांच्या मुळांशी असलेल्या मातीमुळे पाणी धरून ठेवण्याचे प्रमाण वाढून परिसर हिरवागार होण्यास मदत होईल. याकरीता ग्रामपंचायतींनी नदी-नाल्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी  केले.
या पावसाळ्यात 33 कोटी वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, यावल वन विभागाचे उप वनसंरक्षक प्रकाश मोराणकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी बी.ए.बोटे, महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालविकास श्री.तडवी, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्यासह सामाजिक वनिकरण, वन विभाग, जिल्हा परिषद आदी विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी मोठ्या संखेने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे हे पुढे म्हणाले की, वृक्ष लागवड हे राष्ट्रीय काम आहे.  हे काम आपल्याला केवळ उद्दिष्ट्यपूर्तीसाठी करायचे नसून भावी पिढीसाठी हे काम समाजकार्य समजून सर्वांनी स्वयंस्फूर्तीने करावयाचे आहे. सर्वांनी स्वयंस्फुर्तीने हे काम केल्यास जळगाव जिल्हा हिरवागार व वायू प्रदुषणमुक्त होण्यास उशीर लागणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी जळगाव वनविभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार यांनी 1 जूलै ते 30 सप्टेंबर या दरम्यान करावयाच्या वृक्षलागवड कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून रोपे सर्वांना विनामुल्य देण्यात येणार आहे. वृक्षलागवड मोहिमेत शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेवून मोहिम यशस्वी करावी असे उपस्थितांना आवाहन केले. 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणांना वृक्ष लागवडीचे उद्दि्ष्ट देण्यात आले आहे. यामध्ये वनविभाग 41.60 लाख, सामाजिक वनीकरण 20 लाख, ग्रामपंचायत 36.77 लाख, इतर शासकीय यंत्रणा 17.71 लाख, जलसंपदा विभाग 131825,  एमआयडीसी 30 हजार, शिक्षण विभाग 1 लाख 30 हजार 372 , उर्जा विभाग 4530 व इतर सर्व विभाग मिळून जिल्ह्याला  1 कोटी 17 लाख 19 हजार 486  वृक्ष लागवडीचे उदिष्ट देण्यात आल्याची माहिती श्री. पगार यांनी दिली.
यासाठी जिल्ह्यातील वनविभागाच्या रोपवाटीकांमध्ये 60.73 लाख, तर सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीकांमध्ये 61.92 लाख असे एकूण 1 कोटी 22 लाख 65 हजार रोपांची उपलब्धता असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. या मोहिमेची व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिध्दी करुन या मोहिमेत जास्तीत जास्त नागरीकांचा सहभाग मिळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.