जळगाव,-
एकीकडे शेतकरी समृद्ध होण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महानगरपालिकेत शेतकर्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न होत आहे, असा गंभीर आरोप विरोधीपक्ष नेते डॉ. सुनिल महाजन यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना केला. हा प्रकार नगररचना विभागाच्या अधिकार्यांना हाताशी धरुन भांडवलदार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
डांबरीकरणाची अट शिथीलची मागणी करणार
महानगरपालिका क्षेत्रातील लेआऊट मंजुरीसाठी डांबरीकरणाची अट शिथील करण्याची मागणी आयुक्तांकडे करणार असल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले. जुने जळगाव, मेहरुण, निमखेडी, पिंप्राळा, सावखेडा गावठाणातील शेतजमीन मनपा हद्दीत आहेत. यापुर्वी अंतिम लेआऊट मंजुरी देताना आरसीसी गटारी, पथदिवे,रस्ते तयार करुन देणे बंधनकारक होते. परंतु मनपाच्या नगररचना विभागाला भांडवलदारांनी हाताशी धरुन सदर लेआऊटमध्ये पाईपलाईन टाकली, रस्ता डांबरीकरणाची अट टाकली. ही अट जाचक व अन्याय्यकारक आहे. भांडवलदार मनपा अधिकार्यांना हाताशी धरुनसदर जाचक नियम लावत आहे. हा स्थानिक शेतकर्यांवर अन्याय असून जमिनी बळकावण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला.