नगरदेवळा शिवारात गावठी दारूचे अड्डे उध्वस्त

0

पाचोरा (प्रतिनिधी) : देशात कोरोना विषाणुमुळे सर्वत्र थैमान घातलेले असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दि. २२ मार्च पासुन देशात लाॅकडाऊन करण्यात असुन सर्वत्र देशी व विदेशी दारूची दुकाने बंद असल्यामुळे मदयपींची मात्र तारांबळ उडतांना दिसुन आली आहे. कुठेही दारु मिळत नसल्यामुळे या काळात शहरातील व ग्रामीण भागातील धनधाकड मद्य दुकानदार अव्वाच्या सव्वा दराने देशी, विदेशी दारुची विक्री करीत आहे. मध्यमवर्गीय तळीरामांना ही दारु परवडत नसुन व्यसनाधीन तळीरामांनी गावठी दारूकडे मोर्चा वळविला आहे. गावठी दारुची मोठया प्रमाणावर मागणी वाढली असतांना तालुक्यात काही ठिकाणी गावठी दारूच्या भट्ट्या राजरोसपणे सुरू आहेत.

तालुक्यातील नगरदेवळा शिवारात मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या भट्ट्या असल्याची गोपनिय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग, जळगांव यांना मिळाल्यानंतर दि.२८ एप्रिल २०२० रोजी दारूबंदी अधिकारी व्ही. एम. माळी, जवान रवींद्र जंजाळे यांच्या पथकाने सापळा रचून नगरदेवळा शिवारामध्ये अग्नावती धरणाकाठा वरील दारूच्या हातभटया उध्दवस्त केल्या आहेत. यामध्ये १ हजार २७९ लिटर रसायन तसेच ४५ लिटर गावठी हातभट्टी दारू व एक मोटरसायकल (क्रमांक एम. एच.१८ ए. ई ९५२६) सी.डी. डिलक्स गाडी जप्त करण्यात आली आहे. यामध्ये ३ बेवारस गुन्हे व १ वारस असे एकूण ४ गुन्हे दाखल करून २ आरोपींवर कारवाई केली आहे. तसेच तालुक्यात व परिसरात असेच धाडसत्र सुरु ठेवणार असल्याचे दारुबंदी अधिकारी यांनी सांगितले आहे. या कारवाईमुळे गावठी दारु बनविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.