पाचोरा | प्रतिनिधी
जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ “माझी वसुंधरा” अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत नगरदेवळा ता. पाचोरा ग्रामपंचायत व एस. के. पवार माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वसुंधरा जनजागृती रॅली काढण्यात आली. सकाळी आठ वाजता एस. के. पवार विद्यालयातून रॅलीला सुरवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले शहर सुंदर व स्वच्छ कसे राहिल याबाबत गावातून प्रभातफेरी काढत जनजागृती केली. तसेच या रॅलीसोबत गावातील बचत गटातील महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. “माझी वसुंधरा” या योजनेत नगरदेवळा गावाची निवड झाली असून आपले गाव प्लास्टीक, कचरा मुक्त व स्वच्छ ठेवण्याची गावातील प्रत्येक नागरिकांची, विद्यार्थ्यांची जबाबदारी असून आपले गाव जिल्ह्यात, विभागात व राज्यात प्रथमस्थानी आणण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा असे ग्रामविकास अधिकारी संतोष शिवणेकर यांनी रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक व्ही. बी. बोरसे , ग्रामपंचायत कर्मचारी तसेच एस. के. पवार विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.