धुळे रस्त्याच्या कामामुळे दुरावस्था झालेल्या अण्णाभाऊ साठे स्मारकाचे सुशोभीकरण करा- बहुजन रयत परिषदेचे निवेदन

0

अमळनेर(प्रतिनिधी)-  रस्त्याचे काम सुरू असतांना स्मारक वा स्मारकावरील अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा खराब होणार नाही याची संबंधित ठेकेदाराने काळजी घेणे आवश्यक होते,परंतु तेवढी तसदी  संबंधीत धुळे रस्त्याचे ठेकेदार,इंजिनिअर,सुपरवायझर यांनी घेतली नाही.आजही स्मारकाच्या आजूबाजूस मोठ-मोठी खड्डे पडली असून त्याठिकाणी माती,मुरूम,खडी तशीच अस्ताव्यस्त पसरलेली आहे. स्मारकाची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे दलित मातंग समाजाचे असले तरी ते जागतिक दर्जाचे साहित्यिक, लेखक होते. आणि अशा पद्धतीने या महापुरुषाचा अपमान होणे म्हणजे सबंध महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.परिणामी समस्त मातंग समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत.

रस्त्याचे काम फक्त 10 वर्षांसाठीच धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाले आहे.त्यामुळे अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागानेही ह्या प्रकरणाकडे लक्ष घालून सदर स्मारकाचे पूर्वीप्रमाणे सुशोभीकरण करावे अन्यथा येणाऱ्या काळात संबंधित समाजाच्या विविध संघटनांकडून  आंदोलने करण्यात येईल व  काम करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील असे   बहुजन रयत परिषद,लहुजी शक्ती सेना सह मांगीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता हेमंत महाजन यांना निवेदन देऊन आवाहन करण्यात आले आहे.

उपविभागीय अभियंता हेमंत महाजन हे उपस्थित नसल्याने सदर निवेदन त्यांचे शाखा अभियंता संजय पाटील यांनी स्वीकारले.

याप्रसंगी प्रकाश बोरसे,संजय मरसाळे, हरिश्चंद्र कढरे,दिपक गरुड,अनिल मरसाळे, प्रा.विजय गाढे,अविनाश खैरनार,सोमा चंदनशिव,प्रसाद शिरसाठ,लखन चंदनशिव,दशरथ विसावे,उमेश साबळे,सागर अवचिते आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.