धुळे : जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळी कोरोनाचे तीन रुग्ण पाॅझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यात एक पुरूष व दोन महिलांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या १९ वर गेली आहे.
कोरोनाने जिल्ह्याला घेरले असून, धुळे शहर “हॉट स्पॉट’ बनू लागले आहे. एकट्या धुळे शहरात एकूण १४ बाधित झाले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. साक्री शहर, बाह्मणे (ता. शिंदखेडा), आमोदे (ता. शिरपूर) येथे प्रत्येकी एक रूग्ण होता. आता साक्री शहर व आमोदे येथे प्रत्येकी दुसरा कोरोनाग्रस्त रूग्ण आढळला आहे. यात दोन्ही महिला आहेत. कोरोना बाधित क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची सूचना तालुका प्रशासनासह महापालिकेला मिळाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६ वरून १९ झाली आहे. पैकी पूर्वी साक्रीतील एक व धुळे शहरातील तीन, अशा एकूण चौघांचा मृत्यू झाला आहे.