जळगाव, दि.18 –
भावाच्या लग्नासाठी गावी जाण्यासाठी मंगळवारी रात्रीच्या सुमारास कुर्ला-दरभंगा पवन एक्सप्रेसने दोन तरूण निघाले होते. लग्नसराईमुळे रेल्वे गर्दी असल्याने दोघे दरवाज्याजवळ उभे होते. रेल्वेतील काही तरूणांसोबत वाद झाल्याने रावेर रेल्वेस्थानकाच्या अलीकडे चौघांनी एकाला रेल्वेच्या बाहेर फेकले. मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसर्याचाही तोल गेल्याने तो देखील गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली.
बिहारमधील मधुबती येथील मुळ रहिवाशी असलेले नरेशकुमार रामोध्दार यादव वय-19 व मनिषकुमार यादव वय-21 हे दोघे मालाड (मुंबई) येथे एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतात.
रेल्वेत तरूणांसोबत झाला होता वाद
सावदा ते रावेर रेल्वेस्टेशनदरम्यान मनिषकुमार यादव याचा दरवाज्याजवळ उभ्या असलेल्या काही तरूणांसोबत वाद झाला. वाद अधिक वाढल्यानंतर त्या तरूणांनी मनिषकुमार याला रेल्वेच्या बाहेर ढकलले. त्यामुळे तोल जावून तो खाली पडला.
भावाच्या लग्नासाठी जात होते
नरेशकुमार याच्या भावाचे मे महिन्यात लग्न आहे. लग्नासाठी दोघे काल दि.16 रोजी कुर्ला दरभंगा पवन एक्सप्रेसने गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. रेल्वेला गर्दी असल्याने दोघे दरवाज्याजवळच उभे होते.
मित्राला वाचविताना जखमी
मनिषकुमार याला वाचविण्यासाठी मित्र नरेशकुमार याने प्रयत्न केला. परंतू, तो देखील खाली पडला. धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने मनिषकुमार यादव याचा जागीच मृत्यू झाला. तर नरेशकुमार यादव हा गंभीर जखमी झाला.
जिल्हा रूग्णालयात उपचार
घटनेची माहिती कळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जखमीला तात्काळ रक्तबंबाळ अवस्थेत रावेर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमी नरेशकुमार यादव याला उपचारार्थ जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी नरेशकुमार शुध्दीवर आल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविला. दरम्यान, सायंकाळी लोकशाहीच्या प्रतिनिधीने त्याच्याशी संवाद साधला असता रेल्वे घडलेला प्रकार त्याने सांगितला.
पोलिसांनी दिली वेगळीच माहिती
जखमी नरेशकुमार याचा जबाब नोंदविण्यास पोलीस दुपारी जिल्हा रूग्णालयात आले होते. घडलेल्या प्रकाराबाबत त्यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता रेल्वेत गर्दी असल्याने तोल जावून पडल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मूळ जखमीने माध्यम प्रतिनिधींना वेगळीच माहिती दिली.