धरणगाव नगराध्यक्ष निलेश चौधरींनी पत्रकार परिषदेत केला पाणी टंचाईचा खुलासा

0

विरोधी पक्ष आंदोलनाचा घेतला समाचार

धरणगाव : शहरात पिण्याचे पाणी हा सतत चर्चेत राहणारा विषय. मात्र, सध्या काही दिवसापासून पाण्याचे आवर्तनं चुकल्याने गावात टंचाई सदृश्य परीस्थिती निर्माण झाली आहे. नागरीकांची पाण्यासाठी वणवण होत आहे. ही टंचाई पाईप फुटण्याच्या तांत्रिक कारणामुळे निर्माण झाली असून ती लवकरच दूर केली जाईल असे आश्वासन नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिले. काय अडचणी आहेत ? हे माहीत असूनही या समस्येचं विरोधी पक्ष संधीसाधू राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. कोरोना काळात मदत निधी केंद्राकडे पाठवणारे गावात मात्र आंदोलनं करतात अशी टिकाही त्यांनी केली. या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व तालुका उपप्रमुख राजेंद्र ठाकरे उपस्थित होते. वाघ यांनी, या कठीण काळात नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी ज्या हिमतीने व धैर्याने कामकाज सांभाळले त्या बद्दल त्यांचे भरभरुन कौतुक केले.

धरणगाव शहराला पिंप्री व धावडा  डोह येथून पाणी पुरवठा केला जातो. या पैकी पिंप्रीचा पुरवठा तात्पुरता बंद आहे. सध्या धावडा डोहावरुनच पाणी पुरवठा होतो. तेथून येणारी पिईप लाईन ही गाळामुळे ब्लॉक झाली आहे. ती रोटवद जवळ फोडून पाईपातील गाळ काढण्याचे काम युध्द पातळीवर सुरु असल्याची तांत्रिक माहिती नगराध्यक्ष यांनी दिली.  येत्या चोवीस तासात पाणी पुरवठा सुरळुत होईल असे आश्वासन निलेश चौधरी यांनी दिले.

शहरात पाण्यासाठी एकूण ५ मुख्य झोन आहेत. त्यांचे १२० उपझोन केले आहेत. यांना प्रत्येकी सव्वा २ तास पाणी दिले जाते. या कामी नपाचे कर्मचारी १४/१५ तास काम करतात. या वाटपात नागरीकांना आपल्या झोनला १२ ते १४ दिवसात पाणी मिळते. यात वेळेचे नियोजन करुन हा कालावधी दहा दिवसावर आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

शहरातील अंतर्गत पाईप लाईन ही ६० वर्षे जूनी झालेली आहे. ती बदलण्याच्या कामालाही लवकर सुरवात होणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. या कामी नविन डीपीआर मध्ये ३८.५० कोटीची पाईप लाईनची कामे प्रस्तावित असल्याचे ते म्हणाले.

नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी पदभार स्विकारला तेव्हा पासून त्यांनी कामाचा धडाका लावला होता. दुर्दैवाने कोरोनामुळे त्यात अडथळा आला. या कोरोनाकाळातही त्यांनी जनतेची अहोरात्र सेवा केली असे गौरवोद्गार गुलाबराव वाघ यांनी काढले. शिवसेनेची नपात सत्ता असली तरी शिवसेनेने समाजकारण सोडले नाही असं सांगत त्यांनी एक लाखाचा कोरोना मदत निधी उभारत नागरीकांसाठी  अ‍ॅम्ब्युलन्स, अमर रथ आणल्याचे सांगितले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मदतीने भविष्यात १२५ कोटीची विकास कामे प्रस्तावित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

विरोधकांच्या आंदोलनाचा समाचार घेतांना त्यांनी भाजपाच्या दुटप्पीपणावर ताशेरे ओढले. मदत निधी केंद्राला पाठवायचा आणि मदत नपाकडे मागायची याबाबत वाघ यांनी खेद व्यक्त केला. कोविड काळात कोण मदतीसाठी रस्त्यावर उतरले होते आणि कोण घरात सुरक्षित होते हे जनता जाणून आहे असेही त्यांनी म्हटले.

विरोधकांनी विरोध करायलाच हवा. मात्र, तो सदसद्विवेक बुध्दीने व्हावा. शेजारी, पाजारी, नातेवाईक यांना मदत करणे म्हणजे समाज सेवा होत नाही असो टोला वाघ यांनी विरोधकांना मारला. जनतेला पाणी देण्यासाठी आमच्या नगरसेवकांनी घरुन खर्च केला. मात्र, त्याचा ढिंढोरा कधी पिटला नाही असं ते म्हणाले. गावाच्या विकासासाठी सत्ताधारी व विरोधक समन्वयाने जवळ यायला हवेत असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला काही नगरसेवकही उपस्थित होते.

जांभोरा गेट उड्डानपूल व्हावा :

धरणगाव पारोळा रोडवरील जांभोरा रेल्वेगेट बंद करुन तेथे भुयारी रस्ता करण्याचे काम रेल्वेने सुरु केले आहे. हे काम अडचणीचे, खर्चीक आणि त्रासदायक ठरणार आहे असे मत गुलाबराव वाघ यांनी मांडले. त्या ऐवजी तेथे जवळच उड्डान पुलासाठी योग्य साईट असून ती अल्प खर्ची, अनेक ळणं टाकणारी आणि उपयुक्त ठरेल असं ते म्हणाले. उड्डान पूल व्हावा या बाबत रेल्वे अधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.