धरणगाव – धरणगाव तालुक्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. मोठ्या प्रमाणात रोज रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आज दि. १९ मार्च च्या प्राप्त अहवालानुसार नव्याने ६३ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ५०१ झाली आहे. धरणगाव तालुक्यात लॉक डाऊन अत्यावश्यक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी आपले मत व्यक्त केले आहे.
धरणगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतांना प्रशासना कडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने तालुक्यातील सुज्ञ नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. तरी दुसरीकडे ग्रामीण रुग्णालयाचे कायमचेच रडगाणे आहे. ग्रामीण रुग्णालयात नागरिकांना ऑक्सिजन तर सोडाच पण साध्या औषधांचा देखील तुटवडा आहे.
धरणगाव तालुक्यातील व शहरातील रुग्ण एरंडोल येथे सिटीस्केन (एच आर सी टी) तपासणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एरंडोल येथील फक्त ५ % तर ९५ % रुग्ण धरणगाव येथील तपासणी साठी येत असल्याची माहिती प्राप्त होत आहे.
तसेच धरणगाव तालुक्यातील उपचारासाठी येणारे ८० % रुग्ण हे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.
गेल्या काही दिवसांच्या कालावधीत तालुक्यातील मृत्यू चे प्रमाण देखील वाढले आहे. तरी कोरोना चे प्रमाण कमी करण्यासाठी तत्काळ लॉक डाऊन करण्यात यावा असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.