देशातील सर्वात तरुण विभाग प्रमुख : 121 फेलोंना मार्गदर्शन
धरणगाव –
येथील पी. आर. हायस्कूलचे माजी विद्यार्थी व पुणे येथील डॉक्टरेट ऑफ मेडिसीन इन न्यूओनॅट्यालॉजी (क्रिटीकल नवजात बालक अती दक्षता) केंद्राचे प्रमुख डॉ. प्रदीप सुर्यवंशी यांना इंग्लंड (युके) येथील रॉयल कॉलेज ऑफ पेडीयाट्रीक अॅड चाईल्ड हेल्थ तर्फे सन्मानाची फेलोशीप प्रदान करण्यात आली आहे. अश्या प्रकारचा सन्मान प्राप्त करणारे ते देशातील पहिलेच तरुण प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहेत. त्यांच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
डॉ. प्रदीप सुर्यवंशी हे धरणगाव तालुक्यातील आमोदे येथील केंद्रप्रमुख भिकनराव माधवराव सुर्यवंशी यांचे सुपुत्र असून सध्या ते पुण्यात भारती विद्यापीठ, सह्याद्री हॉस्पिटल व नोबेल हॉस्पिटल येथे सेवा देत आहेत.
पीआरचा अभिमान
नवजात शिशू अती दक्षता क्षेत्रात देश विदेशात तज्ञ म्हणून ख्याती प्राप्त झालेली असली तरी या यशाची बीजं धरणगावच्या पीआर. हायस्कूल मध्येच रोवली गेली व याचा आम्हाला अभिमान असल्याचे मुख्याध्यापक प्रा.बी.एन.चौधरी म्हणतात. मराठी माध्यमातून शिक्षण घेवूनही आंतरराष्ट्रीय यशाला गवसणी घालता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे. मातीशी नातं जुळवून ठेवण्यासाठी ते शाळेला नियमित भेट देतात.