जळगाव : सोने व्यापार्याची धनादेश देवून फसवणूक करणार्या जळगाव येथील दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. फसवणुकी प्रकरणी सन 2008 साली जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोने चांदी व्यापारी विलास बाविस्कर यांच्याकडून जितेंद्र सोनी व पंकज सोनी यांनी सोने खरेदी केले होते. यावेळी त्यांनी 2 लाख रुपयांचा धनादेश विलास बाविस्कर यांना दिला होता.
मात्र हा धनादेश वटला नाही. त्यामुळे सराफा व्यावसायिक विलास बाविस्कर यांनी जितेंद्र व पंकज सोनी यांना पैशांची मागनी केली. मात्र वारंवार मागणी करुन ही दोघांनी पैसे न देता फिरवाफिरव करत वेळो वेळी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने विलास बाविस्कर यांनी फिर्याद दिल्याने दोघांविरुध्द सन 2008 साली जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश सी.व्ही. पाटील यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. यात खटल्यात 9 साक्षीदार तपासण्यात आले. सोमवारी न्या. सी.व्ही पाटील खटल्यात दोघांना दोषी धरत कलम 420 प्रमाणे 1 वर्ष कारावास व 2 हजार रुपये दंड, 406 प्रमाणे 6 महिने कारावास व 2 हजार रुपये दंड, 201 प्रमाणे 6 महिने कारावास व 2 हजार रुपये दंड याप्रमाणे शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. आर.पी. गावीत यांनी काम पाहिले.