मुंबई । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. गायिका रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला असून, मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धनंजय मुंडे यांनी बलात्काराचा आरोप तर खोडून काढला, मात्र त्या महिलेसोबत आपले परस्पर संमतीने संबंध असल्याचे मुंडे यांनी मान्य केले आहे.
या घटनेने भाजप आक्रमक झाली असून, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मुंडे यांनी तात्काळ आपला राजीनामा द्यावा अन्यथा भाजप रस्त्यावर उतरेल. असा इशारा भाजपने दिला आहे. मुंडे यांनी दोन पत्नी असल्याची कबुली दिली असून, हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत. सामाजिक न्याय खात्याची महत्वाची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारने बेजबाबदार व्यक्तीकडे दिली आहे. त्याचा समाजावर विपरित परिणाम होणार. असे भाजपाच्या महिला अध्यक्षा उमा खापरे यांनी सांगितले आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनीही मुंडेवर निशाणा साधला. ‘3 महिलांशी संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीमंडळातून बाहेर राहावे. या घटनेने महाराष्ट्राच्या अस्मितेला, संस्कृतीला धक्का पोहचला असून जोपर्यंत आरोपातून मुक्तता होत नाही, तोपर्यंत मुंडे यांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार नाही’ अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी आपली बाजु मांडत म्हटले आहे की,’माझ्यावर होणारे आरोप पुर्णपणे खोटे असून मला बदनामी, ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे मुंडे म्हणाले.