भुसावळ : सख्या भाऊ पक्का वैरी ठरल्याची घटना येथे घडली. वैयक्तिक कारणावरून दारूच्या नशेत सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना आज दि.८ जुन रोजी मध्यरात्री २-३०वाजेच्या सुमारास गंगाराम प्लॉट मध्ये घडली.
स्थानिक खडका रोड भागातील बजाज बिल्डींग शेजारील रहिवासी स्वप्निल प्रल्हाद पाटील(वय २८)व गंगाराम प्लॉट मधील वाहनचालक योगेश प्रल्हाद पाटील (वय ३२) या दोघं सख्या भावांना दारूचे व्यसन होते.यामुळे दोघांच्या बायका (पत्नी ) माहेरी निघून गेल्या आहेत. वडिलांचा मृत्यू झाला असून रेल्वेत कार्यरत असलेली त्यांची आई बाहेरगावी गेलेली होती. खडकारोड व गंगाराम प्लॉट मधील घरात कुणीही नसताना काहीतरी काहीतरी कारणावरून या दोघ भावांमध्ये गंगाराम प्लॉट मधील घराच्या पहिल्या मजल्यावर योगेश व स्वप्नील या दोघ भावंडांमध्ये वाद होवून वाद चव्हाट्यावर गेला .यात लहान भाऊ स्वप्नील पाटील याने मोठा भाऊ योगेश पाटीलच्या गळ्यावर,छातीवर व पोटाच्या एका बाजूला धारदार चाकूने वार केल्याने योगेश हा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला सकाळी ५ वाजेच्या सुमारास गोदावरी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचा भाऊ स्वप्निल प्रल्हाद पाटील ( वय २८ ) यास ताब्यात घेण्यात आले आहे . मयत योगेश याचा मृतदेह नगरपालिका रुग्णालयात आणून डॉ.एस.डी.इंगळे यांनी शवविच्छेदन केले. बाजारपेठ पोलिस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन सायंकाळी उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक देविदास पवार,पोउपनि.मनोज ठाकरे, दत्तात्रय गुळिंग व सहकाऱ्यांनी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे. खून कशामुळे झाला हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
भुसावळ शहरात गेल्या तिन महिन्याच्या कालावधीत खुन , लुटमारी , घरफोडी व गावठी पिस्तुले अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे . यामुळे हे शहर रेल्वेचे जंक्शन स्थानक का ? गुन्हेगारांचे स्थानक असा शहरवासींयामध्ये प्रश्न व भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे . तसेच रात्री -अपरात्री नशेखोरांना मद्य व इतर नशेचे प्रकार बिनधास्तपणे मिळत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत . अशा नशेखोरांच्या उपद्रवामुळे जामनेर रोडवर मध्यरात्री चारचाकी वाहनांची शर्यत लागून अपघात घडल्याची घटनाही पोलीस दप्तरी नोंद आहे . मात्र , स्थानिक लोकप्रतिनिधीही पोलीस प्रशासनाच्या या दुर्लक्षित धोरणांकडे लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे