अहमदनगर :पत्नीने आपल्या अनैतिक संबंधाचे व्हिडिओ पाहिल्याने संतापलेल्या पतीने पत्नीला पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना नेवासे तालुक्यातील मोरेचिंचोरा येथे घडली. या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगणघाट येथील जळीतकांडाचं प्रकरण ताजं असतानाच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
संगीता शंकर हनवते असं या महिलेचं नाव असून, ती सुमारे ७४ टक्के भाजली आहे. तर शंकर दुर्गे असं या आरोपीचं नाव आहे. तिच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शंकरचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. या महिलेबरोबरच्या अनैतिक संबंधाचे व्हिडिओही त्याने बनवले होते. शिवाय दोघांचे फोटोही काढले होते. मात्र हे व्हिडिओ डिलिट करण्यास तो विसरला. नेमका त्याच्या पत्नीच्या हातात त्याचा मोबाइल लागला. त्याच्या पत्नीने हे सर्व व्हिडिओ पाहून त्यानंतर त्याला जाब विचारला असता शंकर बिथरून गेला होता. दोघांमध्ये कडाक्याचे भांडणही झालं. त्यामुळे आपलं बिंग नातेवाईकांसमोर आणि शेजाऱ्यांसमोर फुटण्याची भीती वाटल्याने संतापाच्या भरात त्याने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिलं आणि पसार झाला.