धक्कादायक: नागपूर हिंसाचार प्रकरणात महिला पोलिसाचा विनयभंग
मुख्यमंत्र्यांचा इशारा "दंगेखोरांना सोडणार नाही!"
धक्कादायक: नागपूर हिंसाचार प्रकरणात महिला पोलिसाचा विनयभंग
मुख्यमंत्र्यांचा इशारा “दंगेखोरांना सोडणार नाही!”
नागपूर, : औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादाने नागपुरात सोमवारी उग्र रूप धारण केले. महाल परिसरात दोन गट आमनेसामने आले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर दगडफेक, जाळपोळ आणि हिंसाचार झाला. यामुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४६ जणांना अटक केली असून, त्यापैकी ३६ आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे. तसेच, महाराष्ट्र एटीएसने (ATS) या घटनेचा स्वतंत्र तपास सुरू केला आहे.
मुख्यमंत्र्यांचा इशारा “दंगेखोरांना सोडणार नाही!”
या हिंसाचारावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला. त्यांनी स्पष्ट केले की, “कोणत्याही जाती-धर्माचा असला तरी दंगेखोरांना सोडणार नाही. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
महिला पोलिसाचा विनयभंग – संतापजनक घटना उघड!
हिंसाचारादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भालदारपुरा भागात जमावाने एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी अंधाराचा फायदा घेत काही समाजकंटकांनी हा घृणास्पद प्रकार केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा कसून शोध सुरू आहे.
शहरात तणाव, कडेकोट बंदोबस्त तैनात
हिंसाचारानंतर नागपुरातील विविध भागांत पोलीस तैनात करण्यात आले असून, संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी नागपूर शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.