धक्कादायक : जळगाव कोविड रुग्णालयात मृत वृद्धेच्या कानातील दागिने चोरीला

0

जळगाव : येथील कोविड रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. येथे उपचारादरम्यान दगावलेल्या एका वृद्धेच्या कानातील दागिने चोरीला गेले असून याबाबत वृद्धेच्या मुलाने तक्रार केली आहे. नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे लेखी अर्ज देवून या घटनेचा जाब विचारला आहे.

इंदुबाई माणिकराव देवकर (वय ७०, रा. फर्दापूर, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) यांच्या कानातील दागिने चोरीस गेले आहेत. इंदुबाई यांना न्युमोनियाचा त्रास जाणवत असल्यामुळे आठ दिवसांपूर्वी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची करोना चाचणी केली असता रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. परंतु, प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, इंदुबाई यांना रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांच्या दोन्ही कानात मिळून एक तोळे वजनाच्या सोन्याच्या रिंग होत्या. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांचा मृतदेह पूर्णपणे प्लास्टिकमध्ये गुंडाळून कटुंबीयांच्या ताब्यात दिला. यावेळी दागिने चोरीला गेल्याचे उघड झाले.

इंदुबाई यांचा मुलगा रवींद्र याने अखेरचे दर्शन घेण्यासाठी आईचा चेहरा खुला केला. चेहऱ्यावरील कापड हटवल्यानंतर तिच्या दोन्ही कानातून रक्त आल्याचे दिसून येत होते. निरखून पाहिले असता इंदुबाई यांच्या दोन्ही कानातील सोन्याच्या रिंग खेचून काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. यावर रवींद्र यांनी संताप व्यक्त केला. रवींद्र यांनी संबधित छायाचित्र आपल्या मोबाइलमध्ये टिपले. यानंतर कोविड रुग्णालयाचे डॉ. मारुती पोटे यांच्याकडे त्यांनी लेखी तक्रार केली आहे. मृत आईच्या कानातील दागिने गहाळ झाले असून योग्य ती चौकशी करावी व आम्हास न्याय द्यावा, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनार यांच्या नेतृत्त्वात चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या चौकशीत दोषी आढळून येणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती कोविड रुग्णालयातील डॉ. मारुती पोटे यांनी दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.