पाचोरा (प्रतिनिधी) : जन्मदात्या पित्यानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलींना विहीरीत ढकलुन देवुन त्यांची क्रुर हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्त्येनंतर पित्याने ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पित्याविरुद्ध पिंपळगाव (हरे.) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपळगाव (हरे.) ता. पाचोरा येथील रहिवाशी असलेले विकास सुरेश ढाकरे (तेली) हे दि. २२ रोजी सकाळी ७:३० वाजता आपल्या तनुश्री विकास ढाकरे (वय – १२) व परी (शिवन्या) विकास ढाकरे (वय – ४) या दोन मुलींसह शेळ्यांना पाला घेण्यासाठी जवखेडा शिवारीतील अरविंद केशवराव शिंदे यांचे शेतात गेले होते. अरविंद शिंदे यांच्या शेतात असलेल्या विहीरी जवळ आल्यानंतर विकास ढाकरे यांनी आपल्या जन्मदात्या तनुश्री व परी (शिवन्या) या दोन मुलींना विहीरीत ढकलुन दिले. व स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलींना काय खाऊ घालु ? त्यांचे लग्न कसे होईल ? म्हणुनच ही टोकाची भुमिका घेतली अशी बतावणी विकास ढाकरे हे घटनास्थळी करीत असल्याची प्रत्यक्ष दर्शनींनी मध्ये चर्चा होती. दोघं अल्पवयीन मुलींचे मृतदेह नागरिकांच्या मदतीने विहीरीतुन बाहेर काढण्यात आले. व पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तनुश्री व परी यांचे शवविच्छेदन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. विकास ढाकरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पिंपळगाव (हरे.) पोलिस करीत आहे.

